उझबेकिस्तानमध्ये 18 मुलांच्या कफ सिरपच्या मृत्यूशी संबंधित प्रकरण
वृत्तसंस्था/ नोएडा
उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपच्या कथित मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नोएडास्थित औषध कंपनीच्या तीन अधिकाऱयांना अटक केली आहे. भारतीय कफ सिरपमुळे आपल्या देशात 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा डिसेंबर महिन्यात उझबेकिस्तानने केला होता. गुरुवारी (2 मार्च) एफआयआर नोंदवल्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे. भारताच्या सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) औषध निरीक्षकांनी ही तक्रार केली आहे. यामध्ये ‘मेरियन बायोटेक’ या भारतीय कंपनीच्या दोन संचालकांसह पाच जणांची नावे होती.
अटकेच्या कारवाईसंबंधी कार्यालयाशी संलग्न एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तुहीन भट्टाचार्य, अतुल रावत आणि मूल सिंग यांना अटक केली आहे. कंपनीचे मालक सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. तपास यंत्रणा त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उझबेकिस्तानमधील 18 मुलांच्या कथित मृत्यूनंतर उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (एफएसडीए) विभागाने सेक्टर-67 स्थित फार्मास्युटिकल फर्म मेरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा औषध उत्पादन परवाना निलंबित केला होता. औषध रेकॉर्ड देखभालीव्यतिरिक्त कच्चा माल खरेदीची माहिती वेळेवर न दिल्याने कंपनीचा औषध उत्पादन परवाना निलंबित करण्यात आला आहे.
गाझियाबादचे ड्रग इन्स्पेक्टर आशिष यांनी गुरुवारी रात्री फेज-3 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. सेक्टर 67 मध्ये असलेल्या एका औषध कंपनीत तयार करण्यात आलेले कफ सिरप मानकांमध्ये बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या संचालिका जया जैन, सचिन जैन, ऑपरेशन हेड तुहिन भट्टाचार्य, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट अतुल रावल आणि मूल सिंग आदींविरुद्ध कलम 274, 275, 276, औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 17, 17-ए, 17-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयाने सांगितले.