म्हापसा पोलिसांकडून अवघ्या 12 तासात चोरीचा छडा : रोकडसह तीन मोबाईल संच जप्त, तिघेही अट्टल चोरटे : संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी / म्हापसा
म्हापशात पतसंस्थेसह चार कार्यालये फोडल्याप्रकरणी या चोरीत गुंतलेल्या एकूण तिघां संशयित चोरटय़ांना म्हापसा पोलिसांना अवघ्या 12 तासांच्या आत पकडण्यात यश आले आहे.
म्हापसा येथील एका उघडय़ा रेस्टॉरंटमध्ये हे तिघेही आपल्या मैत्रिणींसमवेत बसले होते. यावेळी पोलिसांनी सापळा रचून या तिघांच्या मुसक्या आवळल्या. हे तिघेही अट्टल चोर असून यापूर्वी मडगाव, फोंडा, पणजी, म्हापसा येथे झालेल्या चोरीत गुंतल्याचे उघड झाले आहे. चोरी केल्यानंतर या तिघांनी मडगाव येथे पळ काढला होता व उद्या ते बिजापूर येथे जाण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वीच म्हापसा पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश मिळविले. तिघेही चोरटे 4 दिवसापूर्वीच कोलवाळ जेलमधून जामिनावर सुटले होते. दोन वर्षांपूर्वी म्हापशात याच रिझीम प्लाझामध्ये चोरी झाली होती, त्या प्रकरणातही याच चोरटय़ांचा हात असावा, असा पोलिसांचा संशय असून पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितामध्ये रमेश सत्या उर्फ उल्गाबा वडार(37) रा. बिजापूर कर्नाटक, संजय शिवाजी बाणे (26) रा. लातूर महाराष्ट्र व महम्मद शेख सलीम (28) रा. गदग, कर्नाटक, सध्या म्हापसा बस स्थानकाजवळ राहत होता. हे तिघेही अट्टल चोर असून रात्री दिवसा ढवळय़ा चोऱया करून ते आपल्या गावी पळ काढत होते व पैसे संपल्यानंतर पुन्हा चोरी करण्यास गोव्यात येत होते. अशी माहिती उघड झाली आहे. चोरीनंतर आपापल्या गावी जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र म्हापसा पोलिसांमुळे तो फसला. संशयित चोरटय़ांनी आपल्या गुह्याची कबुली दिली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान या तिघांनाही रिमांडसाठी न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर केले असता या तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी बाबल आत्माराम धारगळकर रा. शेटय़ेवाडा म्हापसा यांनी म्हापसा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दिली होती. तसेच ऍड. शंकर चोडणकर, ऍड. विनीशा ब्रागांझा, फ्रान्सिस्को सिल्वेरिया यांनी चोरीची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दिली होती. चोरटय़ांनी आपापल्या कार्यालयात घुसून भ्रमणध्वनी व रोख 70 हजार पळविल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलीस उपनिरीक्षक वीभा वळवईकर यांनी भा.दं संहितेच्या कलम 457, 380 (चोरी) प्रकरणी गुन्हा नोंद केला होता.
म्हापसा पोलीस पथकाचे हवालदार आल्विटा डिमेलो, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, अक्षय पाटील, लक्ष्मीकांत नाईक, आनंद राठोड, वामन पालयेकर, सुरेंद्र गावस, संदेश नारोजी यांनी बरेच परिश्रम घेऊन उपअधीक्षक उदय परब व निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीअंती या तिघां चोरटय़ांकडून म्हापसा पोलिसांनी 3 भ्रमणध्वनी व रोख 15 हजार जप्त केले आहेत. उपनिरीक्षक वीभा वळवईकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
डिनरला तिघांही चोरटय़ांना म्हापशात बोलावले व ते पोलिसांच्या जाळय़ात अडकले….
रमेश सत्या वडार रा. बिजापूर हा अट्टल चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी मडगाव, फोंडा, पणजी पोलीस स्थानकात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. मडगाव येथे तो राहत होता. मडगावहून त्याचे ऑपरेशन सुरू होत असे. हे तिघेही एकत्रित येऊन नंतर कुठे चोरी करायची हे ठरवित होते व त्यानुसार चोरी केल्यावर आपल्या गावी पळ काढत असत. त्याप्रमाणे या तिघांनी मिळून हा चार दिवसापूर्वीच चोरीचा डाव आखला होता. यापूर्वी चोरी प्रकरणी अटक केल्यावर जामिनावर ते कोलवाळ जेलमध्ये होते व चार दिवसांपूर्वीच सुटले होते. निरीक्षक परेश नाईक यांची म्हापसा पोलीस स्थानकात बदली झाल्यावर त्यांना चोरीच्या तपासाला सामोरे जावे लागले. आपल्या सूत्रांकडून निरीक्षकांनी मडगावला फिल्डिंग लावली व सत्याच्या एका मित्राला ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिल्यावर पोलिसांनी चाल रचून म्हापसा येथे एका उघडय़ा रेस्टॉरंटमध्ये सत्या व त्याच्या मित्रांना बोलविण्यास सांगितल्यावर सर्वजण रात्रीच्यावेळी डिनरला म्हापशात आले असता ते पोलिसांच्या चालीत अडकल्यावर म्हापसा पोलिसांनी तिघाही चोरटय़ांना ताब्यात घेण्यास यश मिळविले व चोरीच्या घटनेनंतर अवघ्या बारा तासांच्या आत ही कारवाई करून चोरटय़ांना अटक केली.