सध्या आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. यानिमित्त 15 ऑगस्टच्या आधी तीन दिवस सर्व घरे आणि सार्वजनिक स्थानांवर रात्रंदिवस तिरंगा फडकविण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. यासाठी ध्वजसंहितेमध्ये सुधारणाही करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या काही सैनिकांनी समुद्रात खोलवर तिरंगा फडकविण्याचा विक्रम केला आहे. याचा व्हिडिओ सध्या प्रसारित होत असून तो लोकप्रिय झाला आहे.
लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करण्यासाठी तसेच राष्ट्रध्वजासंबंधी त्यांचा आदर वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे भारतीय तटरक्षक दलाने म्हटले आहे. या उपक्रमाचे कौतुक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प्रशंसा केली आहे. तटरक्षक दलाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तटरक्षक दलाचे सैनिक तिरंगा हाती घेऊन समुद्राच्या पाण्यात खोलवर जाताना दिसतात. पाण्यात शिरल्यानंतर ते तिरंगा उभा करतात आणि फडकवितात, असे दिसून येत आहे. एका सैनिकाने या सर्व उपक्रमाचे व्हिडिओ चित्रण केले.