-तुळशीचे गुणधर्म लोकांना भिडले
-तुळशीला मिळाला आरोग्यदायी मान
सुधाकर काशीद,कोल्हापूर
बाजार फुलांचा भरला.. मज तुळस दिसेना असे म्हणायची वेळ मध्यंतरीच्या काळात खरोखरच आली होती. तुळशीचे महत्त्व सांगूनही कोणाला पटेल अशी परिस्थिती नव्हती. पण अलीकडच्या काळात मात्र तुळशीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. घराच्या समोर वृंदावनात, कुंडीत, अंगणात, पत्र्याच्या डब्यात फुलणारी तुळस आता औषधाच्या मॉलमधील शोकेसमध्ये अग्रस्थानी दिसू लागली आहे.
पानाच्या स्वरुपातील तुळस आता काढा, चूर्ण, तुळस गोळ्या, तुलसी वाटिका, क्रीम अशा विविध स्वरूपात तुळस आपले ठळक अस्तित्व दाखवू लागली आहे. आजी आजोबा सांगत होते तेव्हा तुळशीचे महत्त्व आपल्याला पटत नव्हते. पण विचित्र वास्तव असे की, व्यापारी तत्त्वावर तुळशीचे मार्केटिंग सुरु झाले. आणि मुळातच अनमोल आरोग्यदायी गुण असलेल्या तुळशीचे महत्त्व आता बहुतेक सर्वांना पटू लागले.
तुळस माहित नाही असा माणूस नक्कीच नाही. पण तुळशीचे संपूर्ण गुण अनेकांना माहित नाहीत. त्यामुळे दारात तुळस असूनही खोकला, सर्दी, घसा धरणे, त्वचारोग या विकारावर आपण बाह्य औषधांची शोधाशोध सुरू ठेवली. आज (शनिवारी) तुलसी विवाहाचा धार्मिक सोहळा घरोघरी होत आहे. एक धार्मिक विधी म्हणून त्याकडे जरूर आस्थेने पाहिले जात आहे. पण धार्मिक इतक्याच ताकदीने, आरोग्यदायी अंगाने तुळशीकडे पाहणे, तिचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज ठरली आहे.
तुळशीचा आरोग्यदायी उपयोग खूप मोठा आहे. तुळशी भोवतालचे धार्मिक वलय ही मोठे आहे. अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे. किंबहुना धार्मिक आधार घेत एखादा विचार मांडला तर तो लवकर जाऊन भिडतो या अंगाने आपल्या पूर्वजांनी तुळस घरोघरी पोहोचवली आहे. पण तुळशीच्या वाटय़ाला वृंदावन, कुंडी, अंगण, किंवा डब्यात केवळ जमेल तसे फुलत राहायची वेळ आली. तुळशी विवाह ला एकदा दणक्यात विवाहाचा सोहळा झाला की त्या सजलेल्या कुंडीत पुढे तुळस कशीही तग धरून राहू लागली.
वास्तविक तुळस ही खूप आरोग्यदायी. आयुर्वेदात व देशी घरगुती उपचारात तुळशीला मोठे स्थान. प्रत्येक आयुर्वेदिक ग्रंथात तुळशीवर खास प्रकरणे आहेत. तुळस ही तशी सहज वाढणारी आरोग्यदायी वनस्पती. ती आरोग्याच्या कारणास्तव प्रत्येकाच्या हाताजवळ असावी म्हणून धार्मिक आधाराने ती घरोघरी पोहोचवली गेली. पण तिचा आरोग्यदायी वापर खूप कमी होत राहिला. किंवा नेमके आरोग्यदायी फायदे लोकांना कळूच शकले नाहीत. अर्थात आजी-आजोबा वयस्कर नागरिक तुळशीचे महत्त्व सतत सांगत राहिले. पण आधुनिकीकरणाच्या प्रवाहात तुळशीचे महत्त्व केवळ जुन्या आयुर्वेदिक ग्रंथातच राहिले.
पण गेल्या काही वर्षात पुन्हा आयुर्वेदाकडे लोक वळले. व त्यानिमित्ताने तुळशीचे नेमके महत्त्व वेगवेगळ्या आजारातील उपचाराच्या निमित्ताने पुढे आले. पण हा बदल होतानाही थेट दारातल्या तुळशीच्या पानाऐवजी औषधाच्या दुकानात तुळशीचा काढा चूर्ण गोळ्या क्रीम तुळस मिश्रीत चहा आकर्षक पॅकिंगमध्ये मिळू लागले. किंबहुना औषधाच्या दुकानाच्या शोरूम बरोबरच औषधाच्या मॉलमध्ये ही तुळशीचा समावेश असलेल्या औषधी उत्पादनांना अग्रस्थान मिळत गेले. तुळशीचे गुणधर्म परिणामकारक व त्याला मागणी ही चांगली असल्याने वेगवेगळ्या नामवंत कंपन्या तुळसमिश्रित औषधाच्या उत्पादनात उतरल्या. अर्थात लोकांनाही आकर्षक पॅकिंग आकर्षित करीत असते. त्यामुळे मुळातच आरोग्यदायी असलेल्या तुळशीच्या उत्पादनांना खरेच चांगले दिवस आले.
आता खोकल्यावर तुळशीचा काढा आहे. घसा खवखवत असेल तर तुळशी वाटीका आहे. आयुर्वेदिक चहासाठी तुळशी चहा आहे. त्वचारोगावर तुलसी चूर्ण क्रीम आहे. तुळस मिश्रित अगरबत्ती आहे. याशिवाय दारातील अंगणातील तुळशीची दोन पाने रोज तोडून तोंडात टाकण्याची सवय लोकांना लागली आहे. तुळस म्हणजे गावठी औषध नव्हे तर, तुळस म्हणजे निसर्गातले अनमोल औषध अशी ओळख चांगलीच रुजली आहे. तुळशी विवाहाच्या निमित्ताने तुळशीचे हे महत्व आणखी ठळक होत आहे.
अमूल्य वनस्पती
तुळशीची फक्त पानेच औषधी असतात असे नव्हे तर, तुळशीचे बी, तुळशीचे खोड, तुळशीचे मूळ, तुळशीची फुले म्हणजे मंजिरी हे देखील आरोग्यदायी आहे. तुळस ही अँटिबायोटिक म्हणून काम करते. ताप आला तर तुळशीचा उपयोग चांगला होतो. घसा खवखवू लागला तर तुळशीची पाने उपयोगी पडतात. चेहऱ्यावर डाग असतील तर तुळशीचा लेप उपयोगी पडतो. पाण्यात तुळशीची पाने टाकली तर पाणी देखील शुद्ध होते. कोरोना काळात तर तुळशीचा अर्क खूप महत्त्वाचा ठरला.
रूचिता सुनील जितकर, आयुर्वेद तज्ञ
निरांजना समोरची तुळस.
काळी तुळस व हिरवी तुळस असे तुळशीचे दोन प्रकार आहेत.. बहुतेकांच्या दारात अशा तुळशी आहेत. रोज वाटीभर पाणी घातले की तुळस चांगली फुलते. कोणत्याही हवामानात टिकून राहते. पाणी घातले नाही तर रुसते. कोमजते. पण पाणी घातले की पुन्हा फुलते. दिवस मावळताना तुळशी समोर निरंजन लावले की त्या मंद प्रकाशात तुळस आणखी खुलते. घरातल्या आजी, आई, ताई, मावशी, काकी, वहिनींना अशी तुळस आणखी आरोग्यदायी ऊर्जा देते.