पुणे / वार्ताहर :
वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या शिक्षण विभाग कार्यालयातील वरिष्ठ महिला लेखाधिकाऱ्यासह कनिष्ठ लेखाधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी (38) आणि कनिष्ठ लेखाधिकारी अनिल श्रीधर लोंढे (57) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत 43 वषीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक तक्रार केली होती.
तक्रारदार हे शिक्षक असून, त्यांच्या सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून हवी होती. ती पडताळणी करून देण्यासाठी प्रमिला गिरी यांनी 6 हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची एसीबीकडे तक्रार केली. दरम्यान, तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्विकारताना दोघांना एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक श्रीहरी पाटील, उपअधीक्षक विजयमाला पवार यांच्या पथकाने अटक केली.
अधिक वाचा : शिवसेना भवन वा कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही