ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: कोरोना काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पराक्रमच केला आहे. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊच शकत नाही. समोर धोके असतानाही त्यांनी काम केलं. शहरातही समर्थपणे सेवा दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाला, दिवसाला एसटीचं योगदान आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी (S T Workers) कोरोना काळात केलेल्या कामाचं कौतुक केलं. याचबरोबर आपण आपल्या राज्याचं वैभव आहोत याचं भान तुम्हीही ठेवलं पाहिजे, असा सल्लाही दिला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सव आणि विद्युत प्रणालीवरील बसेसचा लोकार्पण सोहळा आज पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे (Pune) ते अहमदनगर (Ahmednagar) या राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक एसटी बसचं उद्धाटन करण्यात आलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्व काही करता येतं पण पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या व्यथा आमच्याकडे नाही मांडणार तर कोणाकडे मांडणार. पण फक्त बरं वाटावं म्हणून न झेपणाऱ्या गोष्टी केल्या आणि उद्या शक्य नसल्या तर मग काय होणार? ? त्यामुळेच आम्ही त्यावेळी जे शक्य होत ते केलं आणि यापुढेही करु असे आश्वासन दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, अनेकदा एसटी तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. पण आपण जर खासगी बसेसच्या बरोबरीने तिकीट दर ठेवणार असू तर एसटी सेवेचा फायदा काय? त्यामुळे आपल्याला साहजिकपणे तोटा सहन करावा लागतो. परिवहनमंत्री अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल काय करायचं असं विचारतात. त्यामुळे आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून दिलं असून, पुढील काही वर्षाचीही हमी घेतली आहे. तुम्हाला फक्त एसटीचे कर्मचारी म्हणून नाही तर कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहतो.असेही ते म्हणाले.
‘शिवाई’ च्या दिवसाला सहा फेऱ्या
शिवाई ही बस एका चार्जिगमध्ये २५० किलोमीटपर्यंत धावते. या बसची लांबी १२ मीटर असून टू बाय टू आसन व्यवस्था आहे. बसमध्ये एकूण ४३ आसने आहेत. याशिवाय पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर दिवसातून ६ फेऱ्या होतील. एका कंपनीकडून सुरुवातीला ५० शिवाई बस घेण्यात येतील. त्यानंतर आणखी १०० शिवाई बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
50 बसचे कसे असेल नियोजन
पुणे-अहमदनगरबरोबरच पुणे ते औरंगाबाद -१० बस
पुणे-कोल्हापूर- १२ बस
पुणे-नाशिक-१८ बस
पुणे-सोलापूर-१० बस