वृत्तसंस्था/ चेन्नई
अमेरिकेची एक युद्धनौका दुरुस्तीसाठी भारतात पोहोचली आहे. भारतीय कंपनी लार्सन अँड टुब्रोच्या चेन्नईतील शिपयार्डमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेची दुरुस्ती केली जाणार आहे. दोन्ही देशांच्या भागीदारीतील हा पुढील टप्पा असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेची युद्धनतौका दुरुस्ती तसेच देखभालीसाठी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतात दुरुस्ती होणारी ही अमेरिकेची पहिली युद्धनौका आहे. युद्धनौकेच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेच्या नौदलाने लार्सन अँड टुब्रो शिपयार्डसोबत करार केला होता. या पावलामुळे जागतिक शिप रिपेअरिंग बाजारपेठेत भारताच्या शिपयार्डच्या क्षमतांचे महत्त्व दिसून येत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या नौदलाची चार्ल्स डय़ू ही नौका 11 दिवसांसाठी कट्टुपल्ली शिपयार्डवर असेल आणि याची दुरुस्ती केली जाणार आहे. एप्रिल महिन्यात दोन्ही देशांदरम्यान युद्धनौकांची दुरुस्ती तसेच देखभालीसाठी परस्परांच्या बंदरांच्या वापरासंबंध्घ करार झाला होता.
अमेरिकेची युद्धनौका दुरुस्ती अन् देखभाल कार्यासाठी भारतात दाखल होण्याचा हा क्षण भारतीय जहाजबांधणी उद्योग तसेच भारत-अमेरिका संरक्षण संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे उद्गार संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी काढले आहेत. भारताच्या 6 मोठय़ा शिपयार्ड्सची उलाढाल आता सुमारे 2 अब्ज डॉलर्स झाली आहे. देशातील शिपयार्ड्स आता सर्वप्रकारच्या अत्याधुनिक जहाजांची निर्मिती करण्यास सक्षम आहेत. भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांत भारतीय जहाजबांधणी उद्योगाच्या यशाचे उदाहरण असल्याचे अजय कुमार यांनी म्हटले आहे.