एकनाथ शिंदे मुख्य नेते ः राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी/ मुंबई
बहुमताच्या जोरावर आपलीच शिवसेना खरी, असा दावा करणाऱया एकनाथ शिंदे गटाने सोमवारी शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करत नवी कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षप्रमुख हे पद नसून मुख्य नेता असे पद निर्माण करण्यात आले आहे. नव्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे हेच पक्षाचे मुख्य नेता आहेत. तर प्रवक्तेपदी दीपक केसरकरांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये सोमवारीच राजीनामा आणि हकालपट्टी करण्यात आलेल्या रामदास कदम यांनाही नेतेपदी स्थान देण्यात आले आहे. याशिवाय 12 खासदारांचा गटही आपल्याच सोबत असल्याचाही दावा करण्यात आला असून हे सर्व शिंदे यांच्याबरोबर ऑनलाईन बैठकीस उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केल्याने शिवसेनेमध्ये थेट उभी फूट पडली असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये मानले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणीही ही असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. राऊत त्यांनी दिल्लीत त्यासाठी पत्रकार परिषदही घेतली आणि शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारिणी घोषित करु शकत नाही, त्यांना राष्ट्री कार्यकारिणी घोषित करण्याचा अधिकार नाही, शिवसेना आजही भक्कमपणे उभी असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या घटनापीठासमोर 20 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची महत्त्वाची बैठक होऊन त्यामध्ये शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये नियुक्त नेत्यांची नावे शिंदे गटाच्यावतीने जाहीर करण्यात आली.
सगळेच खासदार आमच्याबरोबर
शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत असल्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, केवळ 12 नव्हेतर आमच्याबरोबर सगळेच खासदार आहेत. हिंदुत्वाचा विचार आमच्यासोबत आहे. हाच विचार अधिक व्यापक प्रमाणावर पसरवण्याची आमची भूमिका असेल, त्याला सर्वच खासदारांचा पाठिंबा असेल, असे केसरकर म्हणाले. या कार्यकरणी बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी देखील ऑनलाइन उपस्थिती लावल्याचे समजते.
आज लोकसभा अध्यक्षांना देणार पत्र
शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असल्याने शिवसेनेत राष्ट्री पातळीवर फूट पडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभेमध्ये राहूल शेवाळे यांची नवीन गटनेते म्हणून निवड केली जाणार असून भावना गवळी यांचे पक्षप्रतोद पद कायम राहणार असल्याचेही समजते. मंगळवार 19 रोजीच लोकसभा अध्यक्षांना स्वतः शिंदे भेटणार असल्याचे आणि याविषयीचे पत्र देणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ते स्वतः या बारा खासदारांना घेऊन जाणार आहेत. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहा खासदार उरणार आहेत.
शिंदे गट आक्रमक
आपलीच शिवसेना खरी आहे, हा दावा अधिक मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे आक्रमक झाला असल्याचे या घटनेवरुन मानले जात आहे. आमदारांचा मोठा गट फुटल्यानंतर आणि सरकारची स्थापना झाल्यावर ही फाटाफूट अगदी जिल्हा, तालुकास्तरावर आली आहे. ठाणे, नवी मुंबईसह अनेक महापालिकांमधील शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यातच आता खासदारांचीही भर पडली आहे. त्यामुळे खासदारांपासून नगरसेवकांपर्यंत स्थानिक स्वराज संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्तेही आपल्याबाजुने वळवण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. आणि या गटात सहभागी होताना अनेकजण मोठे शक्तीप्रदर्शन करत असल्याने शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे मानले जात आहे.
फुटिरांना कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही ः संजय राऊत
देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल. फुटीर आमदारांनी त्यांचा मालक बदलला, आता शिवसेनेचे पाऊल त्यांच्या छाताडावर असेल, असा हल्लाबोल करत शिवसेनेतून फुटीर होऊन स्वतःचा गट स्थापन करणाऱयांना कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे गटाच्या कार्यकारिणी नियुक्तीवर टीका करताना ते म्हणाले, एक फुटीर गट पक्षाची कार्यकारिणी कशी बरखास्त करू शकतो आणि स्वतःची कार्यकारिणी जाहीर करू शकतो. आमदार पुन्हा फुटतील या भितीतून शिंदे गटाने घाई-घाईने ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. राज्यात सध्या कॉमेडी एक्स्प्रेस 2 कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण गुवाहाटीत पाहिला, आता पार्ट टू आला आहे. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मात्र, जे शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांच्याशिवाय शिवसेना भक्कम उभी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली. शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. काही आमदारांनी फटून जाऊन गट स्थापन केला असेल, पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही. आमदार सांभाळण्यासाठी शिंदे गटाची धडपड सुरू आहे. शिवसेना हा मूळ पक्ष, त्यामुळे इतरांना अधिकार नाहीत. लोक नोकऱया बदलतात, मालक बदलतात तसं या लोकांनी मालक बदलले. आम्ही अजूनही सौम्यपणे जात आहोत. कायदेशीर लढाईत आमचा वेळ जातोय. पण उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱयानंतर जे तुफान निर्माण होईल त्यापुढे कोणीही टीकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, जर लोकसभेमध्ये असा कोणी प्रयत्न करणार असेल त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं जाईल. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामुळे त्यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ बेकायदेशीर असल्याचं संजय राऊत म्हणाले. या देशातील न्यायालयावर आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल असंही ते म्हणाले.
12 खासदारांची ऑनलाईन उपस्थिती
शिंदे गटासोबत असणारे खासदार ः 1) संजय मंडलिक 2) धैर्यशील माने 3) प्रतापराव जाधव, 4) कृपाल तुमाणे, 5) भावना गवळी 6) संजय जाधव 7) हेमंत जाधव 8)संजय गावित 9) श्ा्राrकांत शिंदे 10) राहुल शेवाळे 11) श्रीरंग बारणे 12 ) सदाशिव लोखंडे
शिवसेनेबरोबर असणारे खासदार ः 1) विनायक राऊत 2) अरविंद सामंत 3) गजानन किर्तीकर 4) बंडू जाधव 5) राजन विचारे 6) ओमराजे निंबाळकर