वृत्तसंस्था/ थिंफू
16 वर्षाखालील वयोगटातील येथे शनिवारी सुरू झालेल्या सॅफ पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळवला.
भारताच्या युवा फुटबॉल संघाला इश्फाक अहमद यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यातील हा अ गटातील पहिला सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. सामन्यातील 74 व्या मिनिटाला भारताच्या थोंगबा सिंग उशमने हा एकमेव निर्णायक गोल केला. या सामन्यात भारतीय संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. बांगलादेशला शेवटच्या क्षणापर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत आता भारताचा अ गटातील पुढील सामना 6 सप्टेंबरला नेपाळबरोबर होत आहे. भारतीय फुटबॉल संघाला सरावासाठी चार दिवसांचा कालावधी मिळत आहे. या स्पर्धेमध्ये ब गटात भूतान, पाक आणि मालदिव यांचा समावेश आहे. या दोन गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.