आयपीओचा आकार कमी करणारः आगामी दोन आठवडय़ात लिस्टिंगची तयारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील दिग्गज सरकारी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा (आयपीओ) आकार कमी करण्याचे संकेत निर्माण होत आहेत. या अगोदर आयपीओच्या माध्यमातून 65,000 कोटी रुपये जमा करण्याची योजना होती. मात्र यामध्ये काही प्रमाणात बदल करुन तो कमी करत 30,000 कोटी रुपये करण्यात येण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात आहे.
यासंदर्भात रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या एका अहवालातील माहितीमधून ही माहिती देण्यात आली आहे. हा सर्व बदल रशिया व युक्रेन यांच्यात सुरु असणाऱया युद्धजन्य स्थितीमुळे करावा लागला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच येत्या काळात आयपीओचा आकार कमी करण्यावर भर दिला जात असल्याचीही माहिती आहे. आधीच्या उद्दिष्टामध्ये आता नव्याने बदल करण्यात आला आहे.
आयपीओचा आकार कमी करण्याची कारणे
रॉयर्ट्सच्या अहवालानुसार सरकार आगामी दोन आठवडय़ात शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे. या अगोदर गुरुवारी पीटीआय अहवालात म्हटले आहे, की आयपीओ लाँचिंग संदर्भातील निर्णय चालू आठवडय़ात घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आयपीओशी संबंधीत प्राथमिक टप्प्यावरचे काम पूर्ण झाले आहे, परंतु अंतिम निर्णय घेण्याच्या अगोदर इश्यूच्या प्राईसबाबत अँकर इन्वेस्टर्सच्या प्रतिसादानंतरच चालू आठवडय़ात काय तो निर्णय घेतला जाणार आहे.
सरकारकडे 12 मेपर्यंतचा कालावधी
सरकारला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून अप्रूवलसाठी नवीन पेपर सादर न करताच आयपीओ लाँच करण्यासाठी 12 मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र आयपीओ लाँच झाला नाही तर तो ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.