@ वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
कोरोनाच्या जागतिक उदेकावर नियंत्रण आणण्यासाठी आता अमेरिकेने पुढाकार घेतला असून जगाला आणखी साडेपाच कोटी लसी पुरविण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी मंगळवारी केली. नव्या साडेपाच कोटी लसींपैकी भारतासह दक्षिण आशियाला 1 कोटी 60 लाख लसी मिळणार आहेत, असे बायडन प्रशासनाने स्पष्ट केले.
अमेरिकेने एकंदर 8 कोटी लसी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यांपैकी लसींपैकी अडीच कोटी लसी पुरविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची संबंधित देशांना वाहतूकही सुरू झाली असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. सर्व आठ कोटी लसी जून अखेरीपर्यंत देण्याची योजना अमेरिकेने आखली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.