प्रतिनिधी / मडगाव
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नुकतीच मडगाव येथील क्षयरोग इस्पितळ केंद्रात कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली. कोविडविरुद्धच्या युद्धात सहभागी होत सर्वांनी ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात 37 केंद्रांवर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे. मधुमेह, रक्तदाबसारखा आजार असलेल्या 45 वर्षे व त्यावरील वयाच्या नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. याचा लाभ घेऊन लस टोचून घेण्यास पुढे यावे, असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे.
गोव्यात कोविड स्थिती सध्या नियंत्रणात आहे. पण कोविडविरुद्धची लढाई संपलेली नाही. यापुढेही सामाजिक अंतर नियमाचे पालन करण्याबाबत व मास्क वापरण्याबाबत ढिलाई चालणार नाही, असेही आजगावकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडविरोधी युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोविड प्रतिबंधक लस तयार करण्यास त्यांनी सतत प्रोत्साहन दिले. शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून ही लस तयार केली याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे आजगावकर यांनी सांगितले.