वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2021 च्या टेनिस हंगामातील जानेवारीत होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत स्वीसचा अनुभवी आणि ज्येष्ठ टेनिसपटू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स यांचा सहभाग निश्चित असेल, अशी माहिती टेनिस ऑस्ट्रेलियाचे प्रमुख क्रेग टिले यांनी दिली.
कोरोना महामारी संकटामुळे 2020 च्या टेनिस हंगामावर विपरित परिणाम झाल्याने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. 2020 साली झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेनंतर मार्च महिन्यात जागतिक स्तरावर कोरोना समस्येने थैमान घातले. या महामारीमध्ये लाखो लोकांचे बळी पडले असून कोटय़ावधी लोकांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली. मे महिन्यात होणारी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा कोरोना संकटामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा झाल्यानंतर सध्या पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा पॅरीसमध्ये सुरू आहे.
दरम्यान गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील व्यवसायिक पुरूष आणि महिलांच्या काही टेनिस स्पर्धा प्रेक्षकाविना घेतल्या गेल्या. ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने विशिष्ट नियमावली अंमलात आणण्यात आली. व्हिक्टोरियाची राजधानी मेलबोर्नमध्ये कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 894 जणांचे बळी पडले आहेत. 2020 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत फेडररने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. आतापर्यंत 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा स्वीसचा फेडरर तंदुरूस्तीच्या समस्येवरून टेनिसपासून अलिप्त राहिला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे फेडररने त्यानंतर पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही.
39 वर्षीय सेरेना विल्यम्सने सध्या पॅरीसमध्ये सुरू असलेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत दुखापतीमुळे दुसऱया फेरीतून माघार घेतली. सेरेनाने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. मार्गारेट कोर्टच्या विक्रमी 24 ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाशी बरोबरी साधण्याकरिता सेरेनाला आता केवळ एका ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदाची गरज आहे. 18 ते 31 जानेवारी 2021 साली होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी सेरेनाने आतापासूनच टेनिस सरावाला प्रारंभ केला आहे.