पश्चिम बंगालच्या वाहतूक विभागाने कोलकत्यात भारतात प्रथमच तरत्या वाचनालयाच्या सेवेचा प्रारंभ केला आहे. हे वाचनालय एका नौकेवर स्थापन करण्यात आले असून ते मुलांसाठी आहे. मुलांना वाचनाबरोबरच नौकानयनाचाही आनंद लुटता यावा, ही या सेवेमागची योजना असल्याचे सांगण्यात आले. हुगळी नदीमध्ये हे वाचनालय तरंगणार आहे. विविध स्थानी मुलांना आत घेण्याची तसेच उतरविण्याची सोय यात आहे. ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ असे याचे नाव आहे.
यात इंग्रजी आणि बंगाली भाषेतील 500 हून अधिक निवडक पुस्तके उपलब्ध आहेत. या वाचनालयात बसून हुगळी नदीची एक फेरी पूर्ण करण्यास साडेतीन तास लागतात. हे तरते वाचनालय मिलेनियम पार्क ते बेलुरमठ आणि परत असा प्रवास आठवडय़ातून 3 वेळा करणार आहे. या वाचनालयात विनामूल्य वायफाय सुविधाही मुलांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.