वसीम शेख / कुडाळ :
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमध्ये भरती होऊन गावात प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान मिळवलेल्या गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण करत ”भारत माता की जय” चा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाच्या कडक एन्ट्रीने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले.
सहा महिन्यांपूर्वी शिल्पा चिकणे हिची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आज आली. त्या निमित्ताने आपल्या गावातील कन्येच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता. गावातील ग्रामस्थ विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गांजे गावातील पांडुरंग चिकणे व चिकणे या दाम्पत्याची ही चौथी कन्या. घरची परिस्थिती बेताचीच. आई वडील शेतकरी. मुलगा नाही म्हणून नाराज असणाऱ्या या कुटुंबात शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढली.
गांजे गावातून मेढ्याला पायी जात जावली करिअर अकॅडमीमध्ये प्रचंड कष्ट करत शिल्पाने आसाम रायफलमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न केले. तिच्या अथक परिश्रमाने आज तीने प्रशिक्षणाचा अवघड टप्पा पार करून आपल्या कारकिर्दीला खर्या अर्थाने सुरुवात केली आहे.