प्रतिनिधी / ओटवणे:
ओवळीये गावचे सुपुत्र तथा मठ प्राथमिक शाळा नं. 2 चे पदवीधर शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांची ‘भारत भूषण समान’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नॅशनल अँटी हॅरासमेंट फाऊंडेशन ऑर्गनायझेशनकडून आयडियल इन्स्पायरींग एक्सलंट टिचर म्हणून सावंत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण मध्यप्रदेश-इंदौर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्हय़ातील प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा 65 शाळांमधील 84 विद्यार्थिनी आणि 5 माध्यमिक हायस्कूलमधील 25 विद्यार्थिनी मिळून 70 शाळांमधील 109 विद्यार्थिनी कायमस्वरुपी दत्तक घेत 3 लाख 44 हजार रुपये कायमस्वरुपी देणगी दिली. तसेच स्मार्ट डिजिटल शाळा, कायम बक्षीस ठेव योजना, डीटीएच टीव्ही शाळा, मुलांना शुद्ध पेयजल, हँडवॉश स्टेशन, खेळाडू विद्यार्थी, ग्रामीण शाळा वर्गखोली लाइट फिटींग, शाळेसाठी स्कॅनर प्रिंटर, दहावी प्रथम, द्वितीय, तृतीय कायमस्वरुपी बक्षीस ठेव योजना, निराधार मुलांना सहकार्य, नाटय़मंडळ, कलाकार यांना सहकार्य, बालिकांना वाढदिवस भेट, नवोदीत कवींना पुस्तक छपाई सहकार्य, गरजूंना सहकार्य, महिला व बाल बचतगट, स्थानिक मंडळे यांना आर्थिक मदत, विद्यार्थीहित आदी उपक्रमांसाठी पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत.