करुळ घाटातील दिंगवणे येथील घटना : चालक गंभीर जखमी
प्रतिनिधी / वैभववाडी:
करुळ घाटात ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास करुळ घाटातील दिंडवणे येथे हा अपघात झाला. या अपघातात क्लिनर किरकोळ जखमी झाला. अपघातग्रस्त ट्रकचा चक्काचूर झाला आहे. वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी तत्परता दाखवत जखमीला दरीतून बाहेर काढले.
ट्रक चालक श्रीमंत शशिकांत बिकट (50) हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन कोल्हापूर ते गोवा असे प्रवास करीत होते. ट्रकमध्ये 20 टन मैदा भरलेला होता. करुळ घाटातील दिंडवणे दरम्यान एका धोकादायक वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक दरीच्या बाजूने जात असल्याचे लक्षात आल्याने ट्रकचा क्लिनर धनराज श्रीमंत राऊत याने बाहेर उडी घेतली. त्यामुळे क्लिनर रस्त्यावर पडला. त्याला मुका मार लागून किरकोळ दुखापत झाली.
चालकाच्या शरीरावर गंभीर जखमा
ट्रक दरीत कोसळत असताना चालक बिकट याने उडी घेतली. त्यामुळे ते दरीत सुमारे 50 फुटापर्यंत गेले. या अपघातात चालक श्रीमंत बिकट (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात व पायाला प्रॅक्चर होऊन ते जायबंदी झाले. ट्रकमधील मैदा अपघातस्थळी विखुरला गेल्याने या अपघाताची माहिती अन्य वाहन चालकांना समजली. त्यांनी तात्काळ ही माहिती करुळ चेकनाक्यावरील पोलीस कर्मचाऱयांना दिली.
या अपघाताची माहिती मिळताच करुळ चेकनाक्यावर डय़ुटीला असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी अपघात स्थळावरील स्थिती भयानक होती. घाटात खोल दरीत ट्रक गेल्याने जीवितहानीची शक्यता गृहीत धरून राठोड यांनी तत्परता दाखवून पोलीस निरीक्षक अतुल जाधव व सहकाऱयांना माहिती दिली. तसेच तात्काळ मदत मागितली. यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांनी अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन करुळ येथील सहय़ाद्री जीवरक्षक टीमला पाचारण केले. जीवरक्षक टीम काही वेळातच अपघातस्थळी पोहोचली.
यावेळी राठोड यांनी दोरखंडाच्या सहाय्याने खोल दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. दरीत ट्रकपर्यंत पोहोचत असतानाच चालक 50 फूट अंतरावर जखमी अवस्थेत त्यांना सापडून आला. राठोड यांनी तात्काळ जीवरक्षक टीम व सहकाऱयांना याची माहिती देऊन जखमीला खोल दरीतून रस्त्यापर्यंत आणले. चालकाला गंभीर दुखापती झाल्याने ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांना दरीतून वर आणून आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता कोल्हापूर येथे नेण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी तात्काळ यंत्रणा जखमीला तात्काळ आरोग्य केंद्रात पाठविण्याची सर्व व्यवस्था केली. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर करीत आहेत.
संदीप राठोड यांची पुन्हा कर्तव्यदक्षता
पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही महिन्यांपूर्वी करुळ घाटात झालेल्या अपघातात जीवाची पर्वा न करता चालकाचे प्राण वाचविले होते. त्या अपघातात ट्रकचा अर्धा भाग 1500 फूट खोल दरीत, तर अर्धा भाग रस्त्यावर होता. त्यातून चालकाला सुरक्षित बाहेर काढणे आवश्यक होते. थोडी जरी घाई झाली असती तरी ट्रक दरीत कोसळला असता. अशा स्थितीत कॉन्स्टेबल राठोड यांनी प्रसंगावधान राखीत चालकाला जीवदान दिले होते. राठोड यांच्या या कामगिरीची दखल घेत तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी त्यांचा सन्मान केला होता. रविवारी झालेल्या अपघातातही राठोड यांनी तत्परता दाखवून स्वतः खोल दरीत उतरून चालकाला जिवंत बाहेर काढले आहे. राठोड यांच्या या कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे.