वृत्तसंस्था / हैदराबाद
तेलंगणाच्या नलगोंडा जिल्हय़ात शनिवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. नियंत्रण गमावल्याने हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमधून एक वैमानिक आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक प्रवास करत होते.
दुर्घटनेत एका वैमानिकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर दुसऱया वैमानिकाने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचे तेलंगणा पोलिसांकडून सांगण्यात आले. हेलिकॉप्टर प्रशिक्षणार्थी वैमानिक चालवत होता असे समजते. दोन्ही वैमानिकांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. हे हेलिकॉप्टर हैदराबाद येथील एका उड्डाण संस्थेचे असून आंध्रप्रदेशच्या नागार्जुन सागर येथील स्वतःच्या तळावरून त्याचे कामकाज चालते.
पेद्दावूरा येथील तुंगतुर्थी गावात शेतात काम करत असलेल्या शेतकऱयांनी हेलिकॉप्टर कोसळल्याचे पाहिले होते. त्यांनी तेथे त्वरित धाव घेत आग विझविण्याचे आणि वैमानिकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु एका वैमानिकाचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.