प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या अवमानप्रकरणी बेळगावमध्ये निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी निष्पाप तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हिंडलगा कारागृहात डांबले आहे. अशा तरुणांच्या कुटुंबीयांची शहर म. ए. समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. समितीच्या पदाधिकाऱयांनी भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, बापट गल्ली येथे जाऊन कारागृहातील तरुणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
बहुसंख्य तरुणांच्या पालकांनी, भावंडांनी कारागृहात डांबलेल्या आपल्या नातेवाईकांबद्दल, मुलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे अनेक विद्यार्थी व नोकरी करणारे तरुण नाहक या प्रकरणात गोवले गेले आहेत. कारागृहातील तरुणांची सुटका कधी होणार, याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे या तरुणांच्या कुटुंबातील आनंद हरवला असून आपली मुले कधी परत येतील, या चिंतेमध्ये पालक आहेत. शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी आम्ही वकिलांच्या संपर्कात असून लवकरात लवकर या तरुणांना जामीन मिळेल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, किरण गावडे, मनोहर हलगेकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, गीता हलगेकर, प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते.