पित्याची कमतरता दूर करण्यासाठी बहिणीची शक्कल , विवाहसोहळय़ात भेटीदाखल वडिलांची मूर्ती केली प्रदान
पती किंवा पत्नी निर्वतल्यावर त्याचा पुतळा निर्माण करण्याची प्रथा कर्नाटकात अधिक प्रमाणात दिसून येते. तामिळनाडूतील लक्ष्मीप्रभा हिच्या विवाहात सादर करण्यात आलेला तिच्या वडिलांचा पुतळा चर्चेत आला आहे. लक्ष्मीप्रभाचे वडिल आता हयात नाहीत. वडिल नसल्याने लक्ष्मीप्रभा दुःखी होती. घरात विवाहाची तयारी सुरू असतानाही ती उदास दिसून येत होती. याची जाणीव होताच तिची बहिण भुवनेश्वरीने तिचा आनंद परत आणण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. भुवनेश्वरीने वडिलांचा पुतळा तयार करून घेत लक्ष्मीप्रभाला विवाहात आहेरादाखल दिला आहे.
भुवनेश्वरीने या पुतळय़ाच्या निर्मितीकरता 6 लाख रुपये खर्च केले आहेत. पुतळय़ाची किंमत अधिक आहे, पण माझ्या बहिणीच्या चेहऱयावर कुठल्याही स्थितीत आनंद पाहू इच्छिते. तिच्या आनंदासमोर ही किंमत काहीच नसल्याचे भुवनेश्वरी यांनी म्हटले आहे. विवाहाच्या दिनी वडिल सोबत असल्याचा अनुभव प्राप्त करून लक्ष्मीप्रभाच्या आनंदाला उधाण आले. तिने पतीसोबत पित्याचा आशीर्वादही घेतला.