डार्क स्टोअर्सच्या रुपाने किरकोळ व्यापारात वाढीचे प्रयत्न :ऑनलाइन विक्रीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्लिपकार्ट भारतीय इ-कॉमर्स बाजारात आपली पकड मजबूत व कायम ठेवण्यासाठी डार्क स्टोअर्सच्या मार्गाने पुढे जात आहे. डार्क स्टोअर्स फ्लिपकार्टचे आउटलेट आहे. ज्याच्या आधारे डिलीव्हरीस सुरुवात केली आहे. याचा वापर करुन स्थानिक बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी फ्लिपकार्ट मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करणार असून नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या जिओमार्टलाही टक्कर देण्याची रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती आहे.
फ्लिपकार्ट आक्रमक भूमिका घेत फूड आणि ग्रॉसरी साठवणूक केंद्राच्या क्षमतेसह सज्ज होत आहे. यातूनच कंपनी लवकरच दिल्ली, एनसीआर, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता यासारख्या शहरांमध्ये या प्रकारची स्टोअर्स उघडणार आहे.
मागील आठवडय़ात फ्लिपकार्टने बेंगळूरमध्ये फ्लिपकार्ट क्वीक ही सेवा सादर केली असून याच्या मदतीने स्थानिक बाजारामध्ये दोन तासांच्या कालावधीत जवळपास 2000 ग्रॉसरीसह अन्य उत्पादनांची डिलीव्हरी ग्राहकांना होणार आहे.
कोरोना संकट काळात ऑनलाईन खरेदी विक्री मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. हे पाहूनच ऑनलाइन कंपन्या सक्रीय झाल्या आहेत. रिलायन्सने आपल्या जिओ प्लॅटफॉर्मवर 14 आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या जोरावर रिलायन्सला कर्जमुक्त करत डिजिटल प्रवासाला प्रारंभ केला असून यात इ-कॉमर्स कंपन्यांना शह देण्यासाठी जिओमार्टचा प्रारंभ केल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु या प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी अन्य कंपन्या आपली मोर्चेबांधणी करण्यात मग्न झाल्या आहेत, असे कळते. यामध्ये फ्लिपकार्टच्या डार्क स्टोअर्सचा समावेश होतो.