जॉर्जी गोस्पोडिनोव्ह यांच्या ‘टाइम शेल्टर’चा गौरव
वृत्तसंस्था/ लंडन
बल्गेरियन लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव्ह यांना यावषीचा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार मिळाला आहे. ‘टाइम शेल्टर’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला असून यंदा प्रथमच बल्गेरियन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे. लेखक जॉर्जी यांना बुधवारी लंडनमध्ये बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना 50 हजार पौंडांची बक्षीस रक्कमही मिळाली आहे. यंदा बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत लेखिका मेरीस कोंडे यांनी लिहिलेल्या ‘द गॉस्पेल अकॉर्डिंग टू द न्यू वर्ल्ड’चाही समावेश होता. 2022 चा बुकर पुरस्कार भारताच्या लेखिका गीतांजली श्री यांनी जिंकला होता. त्यांच्या ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता. टॉम्ब ऑफ सॅन्ड हे बुकर जिंकणारे पहिले हिंदी भाषेतील पुस्तक होते.
‘टाइम शेल्टर’ ही ‘क्लिनिक फॉर द पास्ट’ या क्लिनिकची कथा आहे. सदर क्लिनिकमध्ये अल्झायमरने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत केली जाते. डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड आणि ब्रिटनमधील ब्र्रेक्झिटबाबत जनमत चाचणी सुरू असताना गोस्पोडिनोव्ह यांनी ही कादंबरी लिहिली होती. भूतकाळातील आठवणी कथेमध्ये उत्तम प्रकारे विणल्या गेल्या आहेत. त्यात अनेक हृदयस्पर्शी कथा आहेत. ‘टाइम शेल्टर’ स्मृती एखाद्या व्यक्तीची ओळख कशी टिकवून ठेवतात आणि जतन करतात हे शोधून काढते, असे बुकर प्राइजच्या जजिंग पॅनेलच्या अध्यक्षा मोरक्कन लीला स्लिमानी यांनी म्हटले आहे.