दिवसभरात 36 नवे रुग्ण : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1092 वर : 446 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकातही लॉकडाऊन अंशतः शिथिल झाले असले तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. शनिवारी राज्यात 36 नवे रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बेंगळूर शहरात आणखी 14 रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी येथे 13 रुग्ण आढळून आले होते. दिवसागणिक कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बेंगळूर शहरातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. या जिल्हय़ात आतापर्यंत 216 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 115 जण बरे झाले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार राज्यात मागील 24 तासांत नवे 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1092 वर पोहोचली आहे. त्यापैकी 496 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात सर्वाधिक 14, गुलबर्ग्यात 8, शिमोगा, हासन जिल्हय़ात प्रत्येकी 3 तसेच धारवाड, बागलकोट, विजापूर, मंडय़ा, उडुपी, दावणगेरे आणि बळ्ळारी जिल्हय़ात प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. गुलबर्ग्यातही रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. शनिवारी जिल्हय़ात 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या 94 वर पोहोचली आहे.
मागील काही आठवडय़ात बेंगळूरमध्ये रुग्णांच्या संख्येत कमी भर पडत होती. मात्र शुक्रवारी 13 आणि शनिवारी 14 रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात 17 ते 27 वयोगटातील 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे 60 वर्षावरील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे, असा समज खोटा ठरला आहे.
उडुपीत कोरोनाचा पहिला बळी
बुधवारपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या उडुपी जिल्हय़ात दोन दिवसांत 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान या जिल्हय़ात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 37 झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईहून परतलेल्या कुंदापूर येथील 54 वर्षीय पुरुषाला 13 मे रोजी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्याला मणिपाल येथील केएमसी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
म्हैसूर जिल्हा कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांच्या संख्येत काही आठवडय़ापूर्वी बेंगळूरपाठोपाठ दुसऱया स्थानी असलेला म्हैसूर जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे. जितक्या वेगाने या जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तितक्याच वेगाने येथे कोरोनाचे रुग्ण बरे झाले. या जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या 88 वर पोहोचली होती. त्यातील 74 पेक्षा अधिक जण नंजनगूड तालुक्यातील होते. प्रामुख्याने ज्युबिलियंट फार्मा कंपनीतील एका कामगारामुळे येथे 38 कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण 74 जणांना बाधा झाली. 21 मार्च रोजी म्हैसूर जिल्हय़ात दुबईहून आलेल्या पहिला रुग्ण आढळून आला होता. शुक्रवारी शेवटचे दोन रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. समाधानाची बाब म्हणजे इतके रुग्ण आढळून देखील जिल्हय़ात कोरोनाचा एकही बळी गेलेला नाही.