75 वर्षे, 75 प्रजाती वन्यजीव जागृती सप्ताहाला प्रारंभ : गोव्यासाठी गव्या रेडय़ाचे संवर्धन ही संकल्पना
प्रतिनिधी / फोंडा
वन्य प्राण्यांचे पर्यावरणातील महत्त्व सांगणारे तसेच माणूस व प्राण्यांमधील अंतर दूर करणारे प्राणी संग्रहालय हे महत्त्वाचे माध्यम आहे. गोव्यातील एकमेव असे बोंडला प्राणी संग्रहालय पश्चिम घाटीतील जैवविविधतेशी संलग्नीत तर आहेत, शिवाय जागतिक पर्यटन स्थळ म्हणूनही ते पर्यटनासाठीही पुरक आहे, असे उद्गार राज्याचे प्रधान मुख्य वनपाल सुभाष चंद्रा यांनी काढले.
भारताच्या स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे होत असल्याने केंद्र सरकारने वन्यजीव जागृतीसाठी देशभर 75 वन्य प्रजाती, 75 प्राणी संग्रहालय आणि 7ग्न5 सप्ताह हा उपक्रम आखला आहे. त्याचाच भाग म्हणून चौथा राष्ट्रीय सप्ताह गोव्यातील बोंडला अभयारण्यात साजरा करण्यात येत आहे. काल सोमवारी सकाळी बोंडला येथे सुभाष चंद्रा व अन्य वनअधिकाऱयांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या जागृती सप्ताहातंर्गत ऑनलाईन माध्यमातून विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. गोव्यासाठी ‘राज्य प्राणी गवारेडा व त्याचे संवर्धन’ हा विषय असून या संकल्पनेवर आधारीत फलकाचे सुभाष चंद्रा यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरणचे सदस्य सचिव एस. पी. यादव यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी दिल्ली येथील वनअधिकारी सोनाली घोष, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधीकरणाच्या प्रतिनिधी डॉ. गौरी मल्लापूर, राज्याचे मुख्य वनपाल सौरभ कुमार, उत्तर गोव्याचे उपवनपाल ए. जेबेस्तीन, बोंडला प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक परेश पोरोब आदी उपस्थित होते.
बोंडलाच्या विस्ताराला चांगला वाव
बोंडला प्राणी संग्रहालय हे गव्या रेडय़ांच्या प्रजननाचे महत्त्वाचे ठिकाण असून पश्चिम घाटीतील अनेक वन्य प्रजाती या क्षेत्रात सापडत असल्याचे सुभाष चंद्रा यांनी पुढे बोलताना नमूद केले. बोंडलाचे महत्त्व ओळखून त्याचा विस्तार करण्यास खूप वाव आहे. या प्राणी संग्रहालयात किंग कोब्रा, बिबटे यासह अनेक वन्य प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातीही पाहायला मिळतात. बोंडलाचे आकर्षण वाढविण्यासाठी येथील काही प्राण्यांच्या बदल्यात पट्टेरी वाघ व इतर वन्य प्राणी आणण्याचा प्रस्ताव चंद्रा यांनी मांडला. शिवाय बोंडलातील प्राण्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय सेवेत सुधारणा करून या क्षेत्रातील तज्ञ नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केंद्रीय वन्यजीव प्राधिकरणकडे केली.
एस. पी. यादव यांनी केंद्र सरकारने आखलेल्या या वन्यजीव जागृती उपक्रमाविषयी माहिती दिली. गोव्यातील बोंडला प्राणी संग्रहालय हे मिनी झू या विभागात येत असले तरी त्याला पर्यावरणीय व पर्यटनीयदृष्टय़ा विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. वन्य प्राण्यांविषयी शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी हे महत्त्वाचे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. सोनाली घोष यांनी प्रास्ताविक केले.
गव्या रेडय़ाच्या संवर्धनासाठी जागृती सत्रे
आठवडाभर चालणाऱया या कार्यक्रमात आज 6 रोजी बोंडला प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक परेश पोरोब यांचे ‘लोकवस्तीमध्ये येणारे गवे रेडे व त्यातून उद्भवणारा संघर्ष’ या विषयावर सकाळी 10.30 वा. व्याख्यान होणार आहे. 7 रोजी सकाळी 10.30 वा. ‘प्राण्यांच्या प्रजाती समजून घ्या’ या विषयावर मानस मांजरेकर व परेश पोरोब यांचे मार्गदर्शन सत्र होईल. 8 रोजी सकाळी 10 वा. वन कर्मचाऱयांसाठी ‘वन्य प्राण्यांची सुश्रूषा व संगोपन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र होईल. 9 रोजी सकाळी 10 वा. प्रसार माध्यमातील प्रतिनिधींसाठी ‘गव्या रेडय़ाच्या संवर्धनासाठी वनखात्यासमोरील आव्हाने’ या विषयावर उत्तर गोव्याचे उपवनपाल ए. जेबेस्तीन यांचे जागृती सत्र होणार आहे. 10 रोजी शालेय विद्यार्थी व अन्य नागरिकांसाठी ‘गव्यारेडय़ाचे महत्त्व व संवर्धन’ या विषयी जागृती सत्र होईल. 11 रोजी सकाळी 10.30 वा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बोंडला प्राणी संग्रहालयाचे बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा घेण्यात येईल.