तहसीलदारांच्या आवाहनाला सामाजिक संस्थांचाही प्रतिसाद
वार्ताहर/ कराड
लॉकडाऊनच्या काळात कराड शहरासह तालुक्यात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असतानाच शहर व परिसरातील पेट्रोलपंप चालकांनी तहसीलदार अमरदिप वाकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भुकेलेल्यांना अन्न देण्यासाठी पुरवठा विभागाकडे जीवनावश्यक साहित्य जमा करण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच काही समाजसेवी संस्थाही मदतीसाठी पुढे येत आहेत. या मदतीतून उंब्रज व मालखेड येथे परराज्यातील मजूर व तालुक्यातील गरजूंना मदत करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक गोपाल वसू यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन केल्याने परराज्यातील मजूर आडकुन पडले आहेत. अशा मजुरांची मालखेड व उंब्रज येथे रहाण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच कराड शहरासह तालुक्यातील गरजू लोकांना अन्न धान्य मिळावे यासाठी महसुल प्रशासन, पुरवठा विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्था मदत करीत आहेत. बेघर, फिरस्ते अशा लोकांना जेवण पुरवण्यात येत आहे. तर गोरगरीब लोकांना काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून अशा लोकांना धान्य व जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात येत आहे.
याबाबत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी अवाहन केले होते. यास प्रतिसाद देत कराड शहर व तालुक्यातील पेट्रोलपंप चालकांनी प्रतिसाद देत पुरवठा विभागाकडे धान्य व जीवनावश्यक साहित्य जमा करण्यास सुरवात केली आहे. जमा झालेल्या धान्यातून भुकेलेल्यांना जेवण देण्याचे काम करण्यात येणार आहे.