लक्ष्मीरतन शुक्ला यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये यंदाच विधानसभा निवडणूक होणार आहे. परंतु यापूर्वीच सत्तारुढ तृणमूल काँग्रेसला एका मागोमाग एक झटके बसू लागले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री तसेच माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्ला यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
शुक्ला हे राज्याचे क्रीडामंत्री होते. मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरीही ते तृणमूल काँग्रेसचे आमदार असणार आहेत. राजकारणातून अंग काढून घेण्याचा विचार त्यांनी चालविला असल्याचे समजते. त्यांनी हावडाच्या तृणमूल जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे.
शुक्ला हे भारतासाठी 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याचबरोबर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेयरडेव्हिल्स आणि सनरायजनर्स हैदराबादचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. हावडा उत्तर मतदारसंघातून ते आमदार म्हणून विजयी झाले होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्ला यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कुणीही राजीनामा देऊ शकतो असे म्हटले आहे. क्रीडाक्षेत्राला अधिक वेळ देऊ इच्छित असल्याने केवळ आमदार म्हणून कार्यरत राहणार असल्याचे शुक्ला यांनी स्वतःच्या राजीनाम्याच्या पत्रात नमूद केले आहे. याचमुळे शुक्ला यांच्या निर्णयाकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये असे विधान ममतांनी केले आहे.