महसूल उपायुक्त रूजू झाल्याने निकालात लागण्याची अपेक्षा : अशोकनगर विभागीय कार्यालयाला भेट देऊन पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या महसूल उपायुक्तपदाचा गुंता अद्याप संपला नाही. मात्र महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांनी पदाची सूत्रे हाती घेऊन कारभार सुरू केला आहे. रजेवर गेलेले उपायुक्त सोमवारपासून कार्यरत झाले असून विविध विभागीय कार्यालयात जावून पाहणी करीत आहेत. त्यामुळे महसूल खात्याशी संबंधित 550 हून अधिक प्रलंबित असलेल्या फाईल्स निकालात येणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महसूल उपायुक्तांच्या कारभारावर नाराज होऊन महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. त्यामुळे महसूल उपायुक्तांची बदली करण्यात आली होती. मात्र केएटी न्यायालयात दाद मागून बदलीला स्थगिती घेतली होती. त्यामुळे महसूल उपायुक्तपदी एस. बी. दोड्डगौडर पुन्हा रूजू झाले आहेत. मात्र रूजू झाल्यानंतर आठवडाभर रजेवर गेले होते. सुटी संपल्याने दोड्डगौडर हे सोमवारपासून रूजू झाले आहेत. सोमवारी कोनवाळ गल्ली आणि गोवावेस कार्यालयात भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच यावेळी केवळ दप्तरात हजर आणि प्रत्यक्षात गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांची माहिती घेऊन त्यांच्या हजेरीवर शेरा मारला आहे. त्यामुळे महसूल विभागातील वादाला पुन्हा प्रारंभ झाला आहे.
अधिकाऱयांसह कर्मचाऱयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
महसूल उपायुक्त पुन्हा रूजू झाल्याने नागरिकांच्या प्रलंबित फाईल्स निकालात निघतील, अशी अपेक्षा आहे. सध्या महसूल विभागाशी संबंधित 550 फाईल्स प्रलंबित असून या फाईल्स निकालात निघणार का? अशी विचारणा होत आहे. मात्र महसूल उपायुक्तांच्या विरोधात मोर्चात सहभागी झालेल्या अधिकाऱयांसह व कर्मचाऱयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी अशोकनगर विभागीय कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच कार्यालयात उपस्थित नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांना गैरहजरचा शेरा मारला आहे. त्यामुळे वसुली किंवा अन्य कामासाठी कार्यालयाबाहेर गेलेल्या कर्मचाऱयांची गोची झाली आहे.