रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू : म. ए. समितीचे उमेदवार आघाडीवर
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राम पंचायतीच्या मतमोजणीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येळ्ळूरची मतमोजणी घेण्यात आली. येळ्ळूर ग्राम पंचायतीवर पुन्हा एकदा म. ए. समितीने आपले वर्चस्व राखले असून म. ए. समितीचे अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. तर काही उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे म. ए. समितीचेच वर्चस्व राहणार, हे निश्चित झाले आहे.
अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये म. ए. समितीच्या उमेदवारांनी बाजी मारली. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये जोतिबा चौगुले यांनी 334 मते घेतली. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये रमेश मेणसे 287 मते, वॉर्ड क्रमांक 3 मध्ये शालन तानाजी पाटील 321 मते, वॉर्ड क्रमांक 4 मध्ये सतीश पाटील 386 मते, वॉर्ड क्रमांक 5 मध्ये मनीषा मनोहर घाडी 234 मते, वॉर्ड क्रमांक 6 मध्ये दयानंद उघाडे 96 मते, वॉर्ड क्रमांक 8 मध्ये लक्ष्मी भरत मासेकर 374 मते, महेश कानशिडे 327 मते, पार्वती जयसिंग रजपूत यांनी 185 मते घेतली असून हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
वॉर्ड क्रमांक 5 मध्ये अनपेक्षित निकाल
वॉर्ड क्रमांक 5 मध्ये सामान्य उमेदवारांना फटका बसला असून त्या ठिकाणी राखीव उमेदवारांनी जास्त मते घेतल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये परशराम लक्ष्मण परीट 242 आणि राजू मल्लेशी डोण्याण्णावर यांनी 267 मते घेतल्यामुळे या दोघांना विजयी ठरविण्यात आले आहे.
याचबरोबर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये विलास महादेव बेडरे यांनी 394 मते घेऊन विजय मिळविला आहे. वॉर्ड क्रमांक 9 मधून शांता नारायण काकतकर यांनी 349 मते घेऊन विजय संपादन केला. आणखी काही वॉर्डांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
म. ए. समितीचे यापूर्वीच चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे म. ए. समितीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यात आला असून नवचैतन्य निर्माण झाले आहे. रमेश मेणसे अपक्ष म्हणून विजयी झाले. मात्र मी म. ए. समितीचा पूर्वीपासूनचा खंदा कार्यकर्ता आहे. त्यामुळे म. ए. समितीलाच पाठिंबा देईन, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
आहे.