केसीआर यांच्यासोबत बैठकांचे सत्र
वृत्तसंस्था/ हैदराबाद
निवडणूक आयोगाकडून संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभा निवडणूक जाहीर करताच उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव चर्चेत आहे. तर प्रख्यात अभिनेते प्रकाश राज देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत याकरता ते चर्चा करत आहेत.
विधानसभेतील संख्याबळ पाहता तेलंगणाशी संबंधित राज्यसभेच्या जागेवर टीआरएसचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रकाश राज हे टीआरएस अध्यक्ष आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या संपर्कात आहेत. प्रकाश राज अलिकडेच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी एर्रावल्ली येथील फार्महाउसमध्ये पोहोचले होते. याचमुळे त्यांना राज्यसभेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये प्रकाश राज यांनी केसीआर यांची भेट घेतली हाहेती. तर तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील संख्याबळ पाहता सत्तारुढ टीआरएसचा तिन्ही जागांवर विजय निश्चित आहे.
तेलंगणातून राज्यसभेसाठी 7 जागा आहेत, सर्व जागा टीआरएसला मिळालेल्या आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 मे आहे. एका जागेकरता पोटनिवडणूक होत आहे. राज्यसभा खासदार बंदा प्रकाश यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.