तीन हजारपेक्षा अधिक व्यावसायिकांना लाभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मीडियामधील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणारी फेसबुक जवळपास 3,000 पेक्षा अधिक लहान व्यावसायिकांना 32 कोटी रुपयांचे अनुदान देणार असल्याची घोषणा केली आहे. सदरचे अनुदान हे दिल्ली आणि मुंबईसह पाच शहरांमधील लहान आणि मध्यम व्यवसायासाठी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सध्या कोरोनाच्या संकटामधून काही प्रमाणात व्यवसाय वाचविण्यासाठी आणि त्याला आगामी काळात चालना मिळण्यासाठी हा प्रयत्न फेसबुक करत असल्याचे म्हटले जात आहे. फेसबुकने 30 देशांमधील लहान कंपन्यांना कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक प्रभावातून मार्ग काढण्यास मदत मिळावी म्हणून मार्चमध्ये 10 कोटी डॉलर्सच्या अनुदानाची घोषणा केली होती.
मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा अशी मदत उपलब्ध व्हावी यासाठीच हा उपक्रम असल्याचे फेसबुक इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांनी म्हटले आहे. मार्चमध्ये लहान व्यवसायांसाठी 10 कोटी डॉलर्सच्या अनुदानाची घोषणा केली होती. परंतु त्यामधील 43 लाख डॉलर्स दिल्ली, गुडगाव, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूर येथे काम करणाऱया जवळपास 3,000 पेक्षा अधिकच्या लहान व्यापाऱयांना देणार असल्याची घोषणा केली आहे.
फेसबुकची गुंतवणूक
चालू वर्षाच्या प्रारंभी फेसबुकने देशातील जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 5.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. कंपनीने या भागीदारीसोबत भारतामधील लहान व्यापाऱयांसोबत आपण असल्याचे म्हटले आहे.