प्रतिनिधी / बेळगाव
खून प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. कारागृहात त्यांना सुखसोयी पुरविल्या जात असल्याच्या आरोपावरून बुधवारी कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी तपासणी केली.
कारागृह विभागाचे डीआयजी एम. सोमशेखर यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार व इतर अधिकाऱयांसमवेत बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. काही प्रसारमाध्यमांमध्ये झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या अधिकाऱयांनी कारागृहाची तपासणी केली.
विनय कुलकर्णी यांना कारागृहात सर्व सुखसोयी पुरविल्या जात आहेत, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ही तपासणी झाली आहे. तपासणीनंतर डीआयजी ओम सोमशेखर म्हणाले, विनय कुलकर्णी यांना कारागृहाचे जेवण पुरविले जात आहे. त्यांना घरातून अंथरुणही पुरविण्यात आले नाही, हे आरोप बिनबुडाचे आहेत.