देशद्रोही कृत्यांमध्ये सामील असल्याचा दावा : अनेक गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ जम्मू
जेएनयूची माजी विद्यार्थिनी शहला राशिदवर तिचे वडिल अब्दुल राशिद शौरा यांनीच खळबळजनक आरोप केले आहेत. शहला हिच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शहला रशीद हिच्या देशविरोधी कृत्यांमधील सहभागाप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी शौरा यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. जेएनयूमधील ‘देशविरोधी’ तमाशा हा पूर्णपणे पैशांचा खेळ असल्याचे उद्गार शौरा यांनी काढले आहेत. तर शहलाने वडिलांचे आरोप फेटाळून त्यांच्यावर स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इंजिनियर रशीद आणि जुहूर वटाली यांना यापूर्वीच अटक झाली आहे. या नेत्यांनी शहलाला नव्या पक्षात सामील होण्यासाठी 3 कोटी रुपये दिले होते. तत्पूर्वी या नेत्यांनी मला घरी बोलावून नव्या पक्षाची माहिती दिली होती. काही दिवसांनी शहला घरी परतल्यावर तिला याविषयी कळविले होते. शहला रशीदला चुकीच्या मार्गावर वाटचाल करू नको असे बजावले होते, परंतु तिने उलट मलाच धमकाविण्यास प्रारंभ केल्याचे शौरा यांनी म्हटले आहे.
2017 ते 2020 पर्यंत शहलाची देशविरोधी कृत्ये पाहत आलो, अनेकदा समजावूनही तिने हा वाईट मार्ग सोडला नसल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. शहला हिच्याकडून चालविल्या जाणाऱया स्वयंसेवी संस्था आणि अन्य मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी अब्दुल रशीद शौरा यांनी केली आहे. तिच्या स्वयंसेवी संस्थांना कुठून पैसा मिळतो हेही तपासले जावे, असे त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे सांगितले आहे.
देशाच्या विरोधात बोलणे योग्य नसल्याचे शहलाला वारंवार समजाविले होते. परंतु तिने देशविरोधी भूमिका कायम ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहलाने 12 ऑक्टोबर 2019 रोजी जेकेपीएम या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली होती.
शहलाने आरोप फेटाळले
तर शहला राशिदने स्वतःच्या वडिलांनी केलेले आरोप नाकारले आहेत. माझे वडिल पत्नीला मारहाण करणारे व्यक्ती आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, याचमुळे त्यांनी बेताल आरोप केल्याचा दावा शहलाने केला आहे.