डॉ. सुतार खरे समाजभूषण: विजय मोरे
प्रतिनिधी / बेळगाव
फॅमिली डॉक्टर म्हणून काम करताना रुग्णांच्या सुख दुःखाचे साक्षीदार म्हणून काम करणे गरजेचे असते. हीच भूमिका कोरोना काळात जबाबदारीने पार पाडणारे डॉ भूषण सुतार खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे समाज भूषण ठरतात. असे उदगार माजी महापौर विजय मोरे यांनी काढले.
कोरोनाच्या संकटात सतत कार्यरत राहून घरोघरी जाऊन रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉ भूषण सुतार यांचा सन्मान शांताई वृद्धाश्रम आणि क्रीश फौंडेशन यांच्यातर्फे झाला. यावेळी मोरे बोलत होते. डॉ भूषण हे नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्थान ठरतील असेही ते म्हणाले. क्रीश फौंडेशन चे अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक गोपाळराव कुकडोळकर यांच्याहस्ते शाल, भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ भूषण सुतार यांनी याकाळात अनेक गोर गरीब रुग्णांचे तारणहार म्हणून काम पाहिले आहे. डॉक्टर हा देव असतो हे त्यांच्या रूपातून आणि कार्यातून पाहायला मिळाले असे ते म्हणाले. गावोगावी जाऊन गरजू रुग्णांना औषध पुरवठा करणारे वसंत बालिगा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. आश्रमाचे व्यवस्थापक नागेश चौगुले, रजत स्वामी, मारिया मोरे व इतर संचालक यावेळी उपस्थित होते. आपला पेशा निभावणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझे काम केले आहे.या कार्याची दखल घेऊन झालेला हा सत्कार आणखी बळ देणारा आहे असे मनोगत डॉ भूषण सुतार यांनी व्यक्त केले. महम्मद कुन्नीभावी यांनी आभार मानले.