सायना, सात्विकसाईराज-चिराग शेट्टी पराभूत
वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड
स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय यांनी एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर सायना नेहवाल, पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
भारताची प्रमुख बॅडमिंटनपटू सिंधूने तुर्कीच्या नेस्लिहान यिगिटचा 21-19, 21-14 असा पराभव करीत आगेकूच केली. द्वितीय मानांकन मिळालेल्या सिंधूने ही लढत 42 मिनिटांत संपवली. कोर्ट नंबर 1 वर झालेल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात तिसऱया मानांकित सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्यांना बिगरमानांकित इंडोनेशियाच्या प्रमुदया कुसुमावर्दना-येरेमिया एरिच योचे याकुब राम्बितन यांच्याकडून 19-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुष एकेरीत सातव्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने शानदार विजय मिळविताना ख्रिस्तो पोपोव्हवर 12-21, 25-23, 21-11 अशी मात केली. 73 मिनिटे ही झुंज रंगली होती. एचएस प्रणॉयनेही आगेकूच करताना कॅले कोलोनेनचा तीन गेम्समध्ये 19-21, 21-13, 21-9 असा 56 मिनिटांत पराभव केला. त्याची उपांत्यपूर्व लढत पी. कश्यपशी होईल. जागतिक अग्रमानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेनने माघार घेतल्याने पी. कश्यपला पुढे चाल मिळाली.
महिलांमध्ये अश्मिता चलिहाला किर्स्टी गिल्मूरकडून 18-21, 20-22 अशी हार पत्करावी लागली तर सायना नेहवालला पहिला गेम जिंकल्यानंतरही मलेशियाच्या किसोना सेल्वादुरायकडून 17-21, 21-13, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला.