उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांची घोषणा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष राज्याच्या सत्तेवर येण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. यानुसार समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी नव्या वर्षात मोठी घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला 300 युनिट घरगुती वीज मोफत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच समाजवादी सरकार सत्तेवर येताच शेतकऱयांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले आहे.
भाजप सरकारने मागील वर्षी अनेक लोकांना खोटय़ा खटल्यांमध्ये अडकविले आहे. भाजपच्या शासनकाळात सर्वाधिक खटले समाजवादी पक्षाच्या सदस्यांवरच भरण्यात आले आहेत. मागील वर्षी भाजप आमचा सामना करू न शकल्याने त्याने स्वतःच्या सहकारी संघटनांना यात ओढले आहे. विशेषकरून आमच्या निकटवर्तीयांवर छापे पडले असल्याचे अखिलेश म्हणाले.
नववर्षानिमित्त हजारोंच्या संख्येत पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना अखिलेश यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तारीख बदलली असली तरीही आगामी काळात नववर्ष समाजवादी पक्षाचे सरकार येताच साजरे होणार आहे. 2021 या वर्षात भाजपच्या शासनकाळात लोकांना प्रचंड दुःख सहन करावे लागले. सरकारने मदत करण्याची भूमिका घेतली नसल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे.