सर्वच नगरसेवकांना सर्वसाधारण सभेचे वेध
प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेत गतवर्षी अर्थसंकल्पीय सभा झाल्यानंतर कोरोनाचा जिह्यात शिरकाव झाला. कोरोनामुळे दर महिन्यात होणाऱया सर्वसाधारण सभांना ब्रेक लागला. ऑनलाईन सभा घेण्याचा आदेश शासनाचा असला तरीही सातारा पालिकेत इंटरनेटची सुविधा नसल्याने अडचण निर्माण होत होती. आता गेल्या तीन दिवसांपासून पालिकेच्या बजेटच्या पूर्वनियोजनाच्या म्हणजेच बजेटच्या स्थायी समितीच्या बैठका होत असल्याने सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय सभा तरी विना अडथळा पार पडेल का?, सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कोरोनामुळे 22 मार्च 2020 पासून सातारा पालिकेत काही विषय समितीच्या सभा झाल्या आहेत. ज्या सभा झाल्या त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अजिंक्यताऱयावर विशेष सभा दि. 12 जानेवारीला झाली तेवढीच. त्याअगोदर सातारा पालिकेत बांधकामची आणि स्थायीची सभा ऑनलाईन घेण्यात आली. सर्वसधारण सभेला प्रशासनाकडून परवानगीच दिली गेली नसल्याने ती घेण्यात आली नाही. सातारा पालिकेकडून नगरविकास विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु नगरविकास विभागाकडून त्यावर कोणतेही उत्तर आले नाही. तसेच ऑनलाईन सभा घेण्यासाठी सातारा पालिकेन इंटरनेटचे कनेक्शन बदलण्यात आले तरीही तांत्रिक अडचण दुर करता आली नाही. त्यामुळे ऑनलाईनही सभा फक्त निवडीपुरत्याच घेण्यात आल्या. आता गेल्या तीन दिवसांपासून सातारा पालिकेत बजेटची रंगीत तालिम पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत सुरु आहे. गेली तीन दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत या बैठका होत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात बजेटची सर्वसाधारण सभा ही सभागृहात होणार की ऑनलाईन याकडे सगळयांचया नजरा आहेत.