सूरत / वृत्तसंस्था :
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एलअँडटी हजीरा येथील एका सभारंभात 51 के-9 वज्र तोफा राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या तोफेवर आरुढ होत हजीरा परिसरात त्यातून फेरफटकाही मारला आहे. कंपनीने संरक्षणमंत्र्यांना के-9 वज्र-टी तोफेच्या मारकक्षमतेची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान राजनाथ यांनी तोफेवर स्वस्तिक काढून श्रीफळ अर्पण केले. आगामी काळात या प्रकल्पात आणखी 90 तोफा तयार केल्या जाणार आहेत.
गुजरातच्या हजीरा येथील एलअँडटीमध्ये मागील वषीं पहिल्यांदाच खासगी क्षेत्राकरता आर्म्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आली होती. 2018 मध्ये एकूण 100 तोफांच्या निर्मितीचा करार झाला होता. यातील 10 तोफांची राजस्थानमधील जैसलमेर तसेच जोधपूरमध्ये चाचणी पार पडली आहे. या चाचणीनंतरच तोफा सैन्याला सोपविण्यात आल्या आहेत.
के-9 वज्र हॉवित्झर गनचे अनेक सुटे भाग एलअँडटीच्या स्पेशल आर्म्ड सिस्टीम्स कॉम्पलेक्समध्येच निर्माण केले जातात. या गनच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरियाशी सहकार्याचा करार करण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाकडून कुठल्याही खासगी कंपनीला देण्यात आलेला हा सर्वात मोठा व्यवहार आहे. या व्यवहाराच्या अंतर्गत 42 महिन्यांमध्ये 100 तोफा पुरविल्या जाणे अपेक्षित आहे.
43 किमीपर्यंत मारक पल्ला
के-9 व्रज हॉवित्झर गनकडून 47 किलो वजनाचे गोळे 43 किलोमीटरपर्यंत फेकले जाऊ शकतात. गोळय़ाला लक्ष्यापासून 10 मीटरपर्यंत फिरविले जाऊ शकते. 50 टन वजनी एक गन 70 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने मार्गक्रमण करू शकते. ही स्वयंचलित तोफ शून्य त्रिज्येत फिरू शकते.
हजारो सुटेभाग
दक्षिण कोरियासोबत एलअँडटीने या तोफेची निर्मिती केली आहे. के-9 वज्र हॉवित्झर तोफेत एकूण 13 हजार सुटेभाग आहेत. एलअँडटीच्या 5 प्रकल्पांमध्ये एकूण 400 लघु तसेच मध्यम उद्योग कंपन्यांकडून त्यांची निर्मिती होते. एलअँडटीचे एकूण 9 प्रकल्प आहेत. तरीही 4500 कोटींच्या हांव्या टेक्नॉलॉजीसोबत झालेल्या कराराच्या आधारावर उर्वरित 90 तोफा निर्माण करण्यासाठी पहिल्यांदाच खासगी क्षेत्रात आर्म्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे.
के-9 वज्र
-50 किलोमीटरपर्यंत मारक पल्ला
-मोहिमात्मक कक्षा 480 किमी
-15 सेकंदात 3 गोळे फेकण्यास सक्षम
-पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक तोफ
पाकचे आव्हान
‘डागा आणि विसरा’ प्रकारातील या तोफांना पश्चिम सीमेवर तैनात केले जाणार आहे. या निर्णयामुळे मोबाईल आर्टिलरी गनप्रकरणी युद्धक्षेत्रात पाकिस्तानवर आघाडी मिळविता येणार आहे. 2009 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सीमेवरील युद्धावेळी पाकिस्तानला 115 एम 109ए5 तोफा दिल्या होत्या. वज्र तोफा सीमेवर पाकिस्तानच्या या तोफांचा सामना करतील. वज्र तोफांमध्ये वापरण्यात आलेले निम्मे सुटे भाग देशातच निर्माण करण्यात आले आहेत. तसेच या तोफांची निर्यात करण्याचाही विचार सुरू आहे.