आयटी क्षेत्रातील समभागांची चमक : निफ्टीत 137 अंकांची वाढ
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्याच दिवशी सोमवारी ब्रिटनमधील पुन्हा आलेल्या कोरोना विषाणुच्या बातमीने देशातील भांडवली बाजारात मागील सात महिन्याचा विक्रम मोडीत काढीत शेअर बाजार प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले होते. यामध्ये गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसानही झाल्याची नोंद केली आहे. परंतु या नकारात्मक वातावरणाला उभारी देत आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी युरोपीयन बाजाराच्या सकारात्मक संकेतामुळे बीएसई सेन्सेक्स सावरला आहे.
दिवसभरातील चढउताराच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेर 452.73 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 46,006.69 वर बंद झाला आहे. यामध्ये जवळपास 968 अंकांची चढउतार बाजारात राहिल्याचे दिसून आले आहे. याचसोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 137.90 अंकांनी वधारुन 13,466.30 वर स्थिरावला आहे.
बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक नफा कमाईत एचसीएल टेकचे समभाग राहिले असून ते 5 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह टेक महिंद्रा, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, सन फार्मा, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि नेस्ले इंडिया तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला कोटक बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी आयटी क्षेत्रातील कामगिरीमुळे शेअर बाजाराने गमावलेली सोमवारची तेजी पुन्हा प्राप्त केली आहे. महामारीच्या कारणामुळे प्रभावीत झालेल्या कंपन्या मजबूत प्रवास करीत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
जगात पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रभाव वाढतोय, की काय या दडपणाखाली पुन्हा एकदा आर्थिक क्षेत्र येण्याची शक्यता आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाचे नवीन रुप समोर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संकेत आहेत. सध्या पुन्हा महामारीचे वातावरण निर्माण झाले आहे.