चार बॅटरी, चार्जरही सापडल्याने कळंब्याची सुरक्षा यंत्रणा हादरली
प्रतिनिधी / कोल्हापूर
कळंबा कारागृहामध्ये 10 मोबाईल, पेन ड्राईव्ह, चार्जर फेकल्याची घटना ताजी असतानाच कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात आणखी 1 मोबाईल, 4 बॅटऱ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी कारागृहातील बॅराकच्या झडतीवेळी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहाची सुरक्षा यंत्रणाच हादरली आहे.
कारागृहामध्ये मोबाईल, गांजा, पेन ड्राईव्ह, चार्जर, व्ही सील फेकल्याच्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरुन विभागीय चौकशी सुरु आहे. सोबतच पोलीस यंत्रणेमार्फत स्वतंत्र चौकशी सुरु आहे. याची दखल घेवून कारागृह अपर महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी कारागृहाचे अधिक्षक शरद शेळके यांची येरवडा येथे बदली केली आहे.
शुक्रवारी सकाळी 6 ते 8 वाजण्याच्या सुमारास कारागृहाचे उपअधिक्षक चंद्रमणी इंदूरकर यांच्या नेतृत्वाखाली कारागृहाची झडती सुरु असताना सर्कल क्रमांक 1 मधील बॅराक क्रमांक 2 च्या पाठीमागील अतिसुरक्षा विभागाच्या बाजूस मुख्य रस्त्यानजीक एका पिशवीमध्ये 1 मोबाईल, चार बॅटऱया, युएसबी वायर, चार्जर अशा वस्तू आढळल्या. याबाबत तुरुंग अधिकारी महादेव होरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल, बॅटरी पोलीसांकडे जमा करण्यात आले आहेत.
बंदीजनांच्या दोन गटात हाणामारी
कारागृहामध्ये शुक्रवारी रात्री बंदीजनांच्या दोन गटामध्ये शाब्दिक चकमक उडून हाणामारी झाली. या प्रकारामुळे कारागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करुन हा वाद मिटविला. प्रभारी कारागृह उपअधिक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी या घटनेची माहिती तत्काळ अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांना दिली. त्यांनी गांभीर्याने या घटनेची दखल घेत संबंधीत बंदीजनांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. वादावादी झालेल्या गटातील सदस्यांना वेगवेगळया बॅराकमध्ये ठेवून तेथील सुरक्षा वाढवण्याच्या सुचना दिल्या आहेत. यानुसार शुक्रवारी रात्रीच या बंदीजनांना कारागृहाच्या अन्य बॅराकमध्ये हलविण्यात आले. यामध्ये एक बंदीजन किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.