आरोग्यविषयक माहिती ‘ऑनलाईन’वर उपलब्ध होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेलि-मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल. इतकेच नाही तर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेसाठी खुले व्यासपीठ तयार केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. अर्थातच सरकार आरोग्य परिसंस्थेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केल्यानंतर आरोग्याशी संबंधित विविध माहिती ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टम लाँच केले जाईल. याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळेल. याच्या मदतीने आरोग्य पुरवठादारांची माहिती उपलब्ध होणार आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टममध्येच प्रत्येक नागरिकाला एक वेगळी आरोग्य ओळख असेल.
कोरोना महामारीमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमात मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱया 23 संस्थांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात नैराश्य, तणाव आणि अस्वस्थतेची प्रकरणे वाढली आहेत. केंद्र सरकारच्या नॅशनल टेली-मेंटल हेल्थच्या मदतीने लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो.