कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांना रविवारी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. एका स्थानिक स्वराज्य संस्थेतील ई-टेंडरिंगमध्ये सन 2020 मध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण 9 कोटी 91 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण असल्याची माहिती तपास अधिकाऱयांनी दिली. जवळपास दहा कोटी रुपयांच्या या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, जबानीवेळी समाधानकारक उत्तरे प्राप्त न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. निवडणुकीच्या काळात ते भाजपमध्ये आले होते हे खरे असले तरी सध्या ते भाजपमध्ये सक्रिय नसल्याचे भाजपच्या एका स्थानिक नेत्याने म्हटले आहे.