अभिनेत्री तमन्ना भाटियाला ऑगस्ट महिन्यात लोकप्रिय मास्टरशेफ सीरिजच्या तेलगू व्हर्जनची होस्ट म्हणून घोषित करण्यात आले होते. 27 ऑगस्टपासून प्रसारित होणाऱया या शोमध्ये हैदराबादचे शेफ संजय थुम्मा, चलपति राव आणि महेश पडाला हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. पण नव्या माहितीनुसार शोचे निर्माते आणि तमन्ना यांच्यात सर्वकाही सुरळीत नसल्याचे समजते.

शोच्या निर्मात्यांनी तमन्नासोबत चर्चेचे सर्व मार्ग बंद केले आहेत. मास्टरशेफ तेलगूच्या निर्मात्यांकडून पैसे देण्यात न आल्याने इनोव्हेटिव्ह फिल्म अकॅडमी प्रॉडक्शन हाउसच्या विरोधात कारवाई करणे भाग पडले आहे. तमन्नाला सातत्याने त्यांचे मानधन नाकारले जातेय आणि ही अत्यंत चुकीची वागणूक आहे. तमन्ना यांनी स्वतःची अन्य कामे रद्द करून हा शो पूर्ण करण्याचे नियोजन आखले होते. पण आता प्रॉडक्शन हाउसने त्यांच्याशी संपर्क ठेवणेच बंद केले आहे. याचमुळे आता आम्हाला कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे तमन्नाच्या वकिलाने म्हटले आहे. मास्टरशेफ तेलगूच्या निर्मात्यांनी तमन्नाच्या जागी अनसुईया भारद्वाजची निवड केल्याचे समजते.