उन्हाळय़ात नित्याचाच व्यायाम केल्याने चांगला परिणाम होईल, असे अनेकांना वाटते. मात्र तसे काही नसते. ऋतूबदलाचा आणि व्यायामाचा काहीही संबंध नसतो. मात्र व्यायाम कसा करावा आणि कोणता आहार घ्यावा, याची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या गोष्टींकडे आपण नेहमी कानाडोळा करतो, अशा काही गोष्टींबाबत जाणून घेऊया.
व्यायाम प्रकारात बदल – तुम्ही हिवाळय़ात जो व्यायाम करत होता, तोच तुम्ही आताही करता. दररोज जिममध्ये दोन-दोन तास घाम गाळता, मात्र काही खास परिणाम जाणवत नाही. असे का होते माहीत आहे का…? कारण तुम्ही व्यायाम प्रकारात बदल केला नाही. उन्हाळय़ात शरीरातून जास्त पाणी घामाद्वारे बाहेर पडते. अशा वेळी तुम्ही जुनेच व्यायाम प्रकार अवलंबत असाल तर लवकर थकाल. कारण शरीरातील पाणी कमी होत जाईल. परिणामी ऊर्जाही जात राहील. त्यामुळे व्यायामाचे वेळापत्रक बदलणे आवश्यक आहे.
आठवडय़ात चार दिवस पुरे – जर तुम्हाला आठवडय़ातील सहा दिवस व्यायाम करण्याची सवय असेल तर उन्हाळय़ात चार दिवसच व्यायाम करा. तीन दिवस विश्रांती घेतल्यास शरीरालाही दिलासा मिळेल आणि तुमची ऊर्जा कायम राहील. अशा पद्धतीने तुम्ही लवकर थकणार नाही आणि परिणामही चांगला दिसून येईल.

आहारात बदल – उन्हाळय़ाच्या हिशेबाने तुम्हीच आहारात बदल करत असता. मात्र व्यायामाच्या दृष्टीनेही असे करणे आवश्यक आहे. तळलेले पदार्थ अधिक खाऊ नका. खाणे कमी करून पेयपान अधिक करावे. त्यामुळे डिहायडेशन होणार नाही. अर्थात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच चढायला लागलाय. त्यानुसार आहारात आणि व्यायामात बदल करणं आवश्यक आहे. तुमचं शरीर सक्रिय राहील याची काळजी घ्या. शरीराच्या या सक्रियतेसाठी, तुम्हाला आवडतील अशा कुठल्याही गमतीशीर गोष्टी करण्यावर भर द्या. स्विमिंग, किकबॉक्सिंग असे पर्यायही तुम्ही शरीराची हालचाल व्हावी म्हणून निवडू शकता.
व्यायाम करताना घ्या दक्षता
सतत तहान लागणं ही या मोसमातील अगदी सामान्य समस्या आहे. मेहनतीची कामं आणि घामामुळे पाण्याची सातत्याने लागणारी गरज भागली पाहिजे. दिवसाला साधारणतः 10 ते 12 ग्लास पाण्याची आवश्यकता उकाडय़ामुळे भासते. नियमित व्यायाम करत असाल तर, व्यायामाच्या एक तास आधी एक-दोन ग्लास, व्यायामादरम्यान दर पंधरा मिनिटांनी अर्धा ग्लास आणि व्यायामानंतर अर्ध्या तासाने दोन ग्लास पाण्याचं सेवन करावं.
फायदेशीर व्यायाम
पोहणं- उन्हाळा हा पाण्याशी निगडीत व्यायामासाठी उत्तम काळ आहे. सांधे आणि हाडांवर फारसा ताण न येता करता येण्याजोगा उत्तम व्यायाम म्हणजे पोहणं.
सायकल चालवणं- सांध्यांना त्रास न होता करता येईल असा व्यायामाचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे, सायकल चालवणं. त्यामुळे हा पर्यायही निश्चितच फायद्याचा आहे.
चालणं- जॉगिंग ट्रक्स, रस्ते, बीच असे अनेक पर्याय चालण्यासाठी उपलब्ध आहेत. बाहेर मोकळय़ा वातावरणात चालायला आवडत नसेल, तर टेडमिलसारख्या पर्यायांचादेखील तुम्ही विचार करू शकता.
प्राणायाम आणि योगः योगासने हा व्यायामासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल. शरीर आणि मन या दोन्हीला आराम देण्याची क्षमता योगासनांमध्ये आहे. त्याला प्राणायामाची योग्य साथ लाभल्यास, उन्हाळय़ात हा व्यायाम सर्वोत्तमच ठरतो.
टाळावयाचे व्यायाम

उन्हाचा तडाखा असताना व्यायाम करणं टाळा. त्याने उष्माघात, चक्कर येणं यासारखे त्रास संभवतात. या दिवसात थकवा येणं तर अगदीच साहजिक आहे. घराबाहेर करण्याचे व्यायाम निवडत असाल तर, सकाळी लवकर अथवा सायंकाळची वेळ व्यायामासाठी निवडावी. शक्यतो वातानुकूलित जिममध्ये व्यायाम करणं अधिक श्रेयस्कर असतं.
2 तासांत 1 लिटर पाणी – उन्हाळय़ात सर्वात मोठी समस्या असते डिहायडेशन, अर्थात शरीरातील पाणी कमी होण्याची. सतत व्यायाम केल्याने शरीर थकते. त्यामुळे व्यायाम करतानाही तुम्हाला शरीरातील पाणी कमी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. दीड ते दोन तासांच्या व्यायाम सत्रात कमीत कमी एक ते दीड लिटर पाणी अवश्य प्या.