परशुरामाचे उग्र रूप आणि त्याचा क्षत्रियांतक बाणा पाहून भयभीत झालेल्या दशरथाने आपल्या मुलांसाठी अभय मागितले. तरी तिकडे दुर्लक्ष करून परशुराम रामाशीच बोलू लागला. जनकाकडील शिवधनुष्य आणि स्वतःकडील धनुष्याविषयी रामाला माहिती सांगू लागला. विश्वकर्म्याने पूर्वी दोन दिव्य व श्रे÷ धनुष्ये निर्माण केली. एक शिवधनुष्य आणि दुसरे वैष्णव धनुष्य. महादेव शंकर आणि विष्णू यांच्यातील बलाबल पाहण्यासाठी त्याने दोघात युद्ध लावले. त्यात विष्णुने नुसता हुंकार करून भयंकर पराक्रम करणारे शिवधनुष्य जर्जर केले. त्यामुळे महादेव शंकरही स्तंभित झाले. परंतु देवदेवतांनी दोघांनाही प्रार्थना करून शांत केले. शंकरांनी ते जर्जर धनुष्य विदेहराज देवराताकडे बाणांसह दिले. तर विष्णूने आपले वैष्णव भ्रुगुपुत्र ऋचीकाला दिले. परंपरेने शिवधनुष्य जनकाकडे तर वैष्णव धनुष्य जमदग्नीकडे (परशुराम पिता) आले. जे जर्जर झालेले शिवधनुष्य होते, ते आठ चाकी गाडय़ावरून ओढून आणायला कमीत कमी पाच हजार मजूर लागत. म्हणजे त्याचे वजन किती प्रचंड होते हे लक्षात येते. ते धनुष्य देवताराकडे आल्यापासून देव,गंधर्व,यक्ष,राक्षस इ.पैकी कोणी उचलूही शकले नव्हते. परंतु लहानखुऱया रामाने मात्र ते सहज उचलून दाखवले. हे पाहून खरे म्हणजे परशुरामाने त्याचे अभिनंदन करण्याऐवजी उलट द्वंद्वाचेच आव्हान दिले. तेवढय़ासाठी तो महेंद्र पर्वत सोडून जनकनगरीपर्यंत आला. आपल्या वैष्णव धनुष्याचे वर्णन करताना पैतृक परंपरेने आलेले ते धनुष्य किती प्रचंड आणि शक्तीमान आहे हे त्याने सांगितले. हे सांगतानाच त्याने रामाला क्षात्रधर्माचेही स्मरण करून दिले, जेणेकरून तो डिवचला जाईल. रामालाही ते अवमानकारक वाटले. पण तो मर्यादा पुरुषोत्तम राम होता. अत्यंत शांतपणे तो परशुरामाला म्हणाला, ‘हे भार्गवा, क्षात्रधर्माने संपन्न असलेल्या माझा वीर्यहीन, अशक्ताप्रमाणे तू अवमान करीत आहेस. हे आम्हाला खपत नाही. म्हणून आज माझे तेज आणि पराक्रम तू पहाच! परशुरामाने केलेल्या अवमानाचा शांतस्वभावी रामालाही राग आला. त्याने आपले उग्र रूप प्रकट करून परशुरामाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. त्याने भार्गवाचे धनुष्य आणि बाण यांचा स्वीकार केला. लीलया धनुष्याला प्रत्यंचा चढवून बाण लावला आणि परशुरामाला म्हणाला, ‘तू ब्राम्हण आहेस म्हणून मला पूज्य आहेस, तसेच विश्वामित्रांच्या बहिणीचा नातू आहेस, म्हणून मी तुझ्यावर प्राणघातक बाण सोडणार नाही. तेव्हा हे परशुरामा, ही तुझी गति (पाय) किंवा तप सामर्थ्याने संपादित केलेले अप्रतिम लोक नाहीसे करावे असे मला वाटते.’ दाशरथी रामाची ही प्रतिक्रिया पाहून परशुराम अवाक् झाला.
Previous Articleऍश्ले बार्टी उपांत्य फेरीत
Next Article नव्या इतिहासाचा सरस्वती सन्मान!
Related Posts
Add A Comment