गुप्तचर यंत्रणांनी दिला इशारा ः आयएसआयचे स्लीपर सेल सक्रीय
वृत्तसंस्था/ चंदीगड
पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने भारताला नुकसान पोहोचविण्यासाठी मोठा कट रचला असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने स्लीपर सेल्सच्या मदतीने रेल्वेमार्गांना नुकसान पोहोचविणचा कट रचला आहे. रेल्वेमार्गांना उडवून पंजाब आणि नजीकच्या राज्यांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा आयएसआयचा डाव आहे. मालगाडींसाठी वापरले जाणारे रेल्वेमार्ग आयएसआयचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे.

भारतातील स्वतःच्या हस्तकांना आयएसआय मोठय़ा प्रमाणात पैसा पुरवत असून याद्वारे रेल्वेमार्गांना लक्ष्य करण्याचा कट आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानच्या स्लीपर सेलला दहशतवादी कारवायांसाठी मोठी रक्कम देण्यात येत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
घुसखोर ताब्यात
22 मे रोजी सैन्याने जम्मू सीमेनजीक पाकिस्तानी इसमाला अटक केली आहे. सैन्याने जम्मूच्या खुरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक एका 21 वर्षीय पाकिस्तानीला ताब्यात घेतले. पाकिस्तानातील मलिक चक येथे राहणारा कृपाण नवाज शनिवारी जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये घुसला होता. त्याला अटक करत चौकशीसाठी रविवारी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचा वापर
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा सीमेवर एखादा हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. तालिबानच्या नावावर जम्मू-काश्मीरमधील युवकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू आहे. याकरता अफगाणिस्तानात लुटण्यात आलेल्या अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वापर होण्याची शक्यता आहे.
2 दहशतवादी गट सक्रीय
इंटेलिजेन्स इनपूटनुसार जम्मू-काश्मीरमध्ये आयएसआयच्या इशाऱयानुसार दोन दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सामील आहे. दोन्ही गट अनेक छोटय़ा-छोटय़ा संघटना तयार करून दहशतवादी हल्ले घडवून आणत आहेत. यात तहरीक-ए-इस्लामी आणि रेजिडेंट प्रंट प्रामुख्याने सामील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही वर्षांपासून स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढत आहे. 2018 मध्ये 187 तर 2019 मध्ये 121 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले होते. 2020 मध्ये हा आकडा 181 आणि 2021 मध्ये 142 तर 2022 मध्ये 28 राहिला आहे. तर काश्मीरमध्ये मागील 4 महिन्यांमध्ये 460 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.