माजी सैनिकांची केली होती भरती ः चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे
वृत्तसंस्था/ चंदीगड
अमृतपाल सिंहचा गनमॅन तेजिंदर सिंह उर्फ गोरखा बाबाला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालच्या गनमॅनच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होत आहेत. सैन्यातून निवृत्त किंवा निलंबित झालेल्या सैनिकांना अमृतपाल स्वतःच्या कथित फौजमध्ये भरती करत होता. या माजी सैनिकांच्या मदतीने अमृतपाल कट्टरवादात लोटले गेलेल्या तरुणांना शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देत होता.
पोलिसांनी तपास करता 2 माजी सैनिकांची ओळख पटविली आहे. वरिंदर सिंह आणि तलविंदर सिंह अशी त्यांची नावे असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे. माजी सैनिकच तरुणांना जल्लूपूर खडा गावात प्रशिक्षण देत होते. या प्रशिक्षणाचे अनेक व्हिडिओ अन छायाचित्रे गोरखा बाबाच्या मोबाइलमधून रिकव्हर करण्यात आली आहेत. पोलिसांना 10 बुलेटप्रूफ जॅकेट्स, पाकिस्तानी ड्रायव्हिंग लायसन्स देखील सापडली आहेत. गनर गोरखा बाबाने चौकशीत शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणाची बाब कबूल केली आहे.
अमृतपालच्या एका ठिकाणावरून खलिस्तानचे कथित चलन, झेंडा तसेच नकाशा हस्तगत करण्यात आला आहे. प्रायव्हेट आर्मी आनंदपूर खालसा फौजसह एक क्लोज प्रोटेक्शन टीम अमृतपालने तयार केली होती. याचबरोबर आनंदपूर खालसा फौजच्या प्रत्येक सदस्याला विशेष क्रमांक देण्यात आला होता अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमनीत कौंडल यांनी शुक्रवारी दिली आहे.
खलिस्तानी कारवायांसाठी अमृतपालने शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव चालविली होती. अमृतपालकडून दोन व्हॉट्सऍप ग्रूप तयार करण्यात आले होते. आनंदपूर खालसा फौजशी संबंधित ग्रूपमध्ये नव्या युवकांना जोडून चिथावणी दिली जात होती. दुसरा ग्रूप अमृतपाल टायगर फोर्स या नावाने होता आणि यात केवळ अमृतपालचे निकटवर्तीयच सामील होते.

पंजाब पोलिसांना अमृतपालच्या घरात त्याचा पासपोर्ट मिळालेला नाही. पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली असता त्यांना पासपोर्टबद्दल माहिती देणे टाळले आहे. हे पाहता पोलिसांनी विमानतळ तसेच देशाच्या सीमांवर अमृतपालच्या लुकआउट सर्क्युलरचे रिमांइडर पाठविले आहे. पंजाबमधून फरार झालेला अमृतपाल आता हरियाणानंतर उत्तराखंडात पोहोचल्याचा संशय आहे. नेपाळमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न तो करणार असल्याचा संशय पोलिसांना आहे.
उत्तराखंडमध्ये अमृतपाल तसेच त्याच्या 5 सहकाऱयांची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. दुसरीकडे नेपाळ सीमेवर तैनात सुरक्षा दलाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहेत. अमृतपाल किंवा त्याच्या सहकाऱयांना आश्रय दिल्यास एनएसए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे, तर अमृतपालसंबंधी माहिती देणाऱयाला इनाम देऊ असे उत्तराखंड पोलिसांकडून सांगितले जात आहे.
आयएसआयचा वरदहस्त
अमृतपाल हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशाऱयावर काम करत असल्याचे सूत्रांकडून समजते. दुबईतून पंजाबमध्ये येण्यापासून व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यापर्यंत सर्व योजना आयएसआयनेच तयार केली होती. अमृतपालला फरार होण्यास आयएसआयचे हस्तक मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे.