प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णयानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून कनिष्ठ सहाय्यक व कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा पार पडली. ताराबाई पार्क येथील न्यु मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येकी 1 पदासाठी परीक्षा झाली.
कनिष्ठ सहाय्यक संवर्गातून 1 पदासाठी 229 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 205 अर्ज पात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी 112 उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते. तर 93 उमेदवार अनुपस्थित होते. तर कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातून 1 पदासाठी 100 अर्ज प्राप्त झाले हेते. त्यापैकी 89 अर्ज पात्र झाले. त्यापैकी 60 उमेदवार परीक्षेस उपस्थित होते. तर 29 गैरहजर राहिले. या परीक्षेची उत्तरपत्रिका रविवारी सायंकाळी 4 वाजता कोल्हापूर जि.प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्याबाबत कोणत्याही हरकती असतील तर त्या सोमवारी (13 जानेवारी) सायंकाळी 4 वाजेपर्यंत ceozpkolhapur@gmail.com/ dyceogenkop@gmail.com किंवा समक्ष सादर करता येणार आहे. मदतीनंतर येणाऱया हरकतींची दखल घेतली जाणार नाही. जर काही हरकती प्राप्त झाल्या तर त्यावर तज्ञ समितीमार्फत योग्य निर्णय घेऊन 14 जानेवारीस अंतिम निकाल व निवड यादी जाहीर केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी सांगितले.
जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई, सीईओ अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी गटविकास अधिकारी शरद मगर, अनिल वाघमारे यांनी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले.