नुतन जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांची मोठी कारवाई
प्रतिनिधी / उंब्रज
उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्हय़ातील व दोन टोळ्यांमधील सात जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक तथा अजयकुमार बंसल यांनी हद्दपार केल्याचे आदेश जारी केले आहेत.
याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने मंगळवारी दिली. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हद्दपार प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सादर केला होता. यावर तातडीने कारवाई करत नुतन जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रथमच मोठी कारवाई करत सात जणांना तडीपार केले आहे.
उंब्रज व पाटण पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी करणाऱया टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे (रा. जाळगेवाडी, ता. पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायकवाड (रा. उंब्रज) सोन्या शाहीद शब्बीर मुल्ला (रा. उंब्रज) रोशन उर्फ रोश्या अरविंद सोनावले (रा.उंब्रज) यांची टोळी तयार झाली होती. ते टोळीने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनही व यापूर्वी सन 2019 मध्ये त्यांना सहा महिने सातारा जिल्हा हद्दपार करुन सुध्दा त्यांनी हद्दपार कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे केले होते.
या टोळीतील चार इसमांना पूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हय़ातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातुन एक वर्षा करिता हरपारीचा आदेश केला आहे. तसेच उंब्रज पोलीस ठाणे हदीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत मारामारी, जळीत, शिवीगाळ, दमदाटी, करणारे टोळीचा प्रमुख रणजित नधुराम सरगर (रा. वाघेश्वर, ता.कराड), अक्षय ऊर्फ आप्पा अंकुश लोखंडे (रा.संजयनगर मसूर) धीरज रघुनाथ जाधव (रा. वाघेश्वर) यांना सुधारणेची संधी देऊनही व त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही. या टोळीतील तिघांना पुर्ण सातारा जिल्हय़ातून सहा महिन्याकरिता हद्दपारीचा आदेश केला आहे.