ऑनलाईन टीम / काहिरा :
इस्राईलने हमासविरोधात कारवाई करताना गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात पॅलेस्टाईनचे गाझा शहर उध्वस्त झाले. या उध्वस्त शहराच्या मदतीला आता इजिप्त धावून आला आहे. इजिप्त सरकारने गाझातील नागरिकांसाठी 130 ट्रक भरून मदत पाठवली आहे. त्यामध्ये कपडे, फेस मास्क, आंथरुण-पांघरुन, औषधे, किटकनाशके, खाद्य सामग्री अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये 11 दिवसांपासून संघर्ष सुरू होता. या संघर्षात हमासने इस्राईलवर तीन हजारांवर रॉकेट डागले. इस्राईलनेही हमासचे प्राबल्य असलेल्या गाझा पट्टीवर जोरदार हल्ला चढवला होता. यात गाझा शहर उध्वस्त झाले. या हल्ल्यात पॅलेस्टाइनमधील 232 जणांचा तर इस्राईलमधील 12 जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, इजिप्तने हमास आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी करत शस्त्रसंधी केली. शस्त्रसंधीच्या आधीच इजिप्तने गाझाच्या पुनर्निमाणासाठी 50 कोटी डॉलरची मदत करणार असल्याचे जाहीर केले होते.