वार्ताहर / उसगांव
उसगांव पंचायतीतर्फे काल शुक्रवारपासून पुढील आठ दिवसांसाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी उसगांव बाजारपेठेसह पंचायत क्षेत्रातील सर्व दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले. काही बॅका व आर्थिक व्यवहारांशी संबंधित आस्थापने खुली होती.
उसगांव भागात गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रूग्णांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असल्याने पंचायतीतर्फे गुरूवार 6 रोजी व्यापारी व काही नागरिकांनी बैठक घेऊन शुक्रवार 7 मे ते 17 मे पर्यंत पंचायत क्षेत्रात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्य़ासाठी किमान चौदा दिवस लॉकडाऊन अपेक्षित होते. सरकारकडून कुठलीच पावले उचलली जात नसल्याने व कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढत असल्याने उसगांव पंचायतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आठ दिवस लॉकडाऊनचा निर्णय घेतला. जीवनाश्यक वस्तूच्या खरेदीसाठी सकाळी 8 ते दुपारी 11 वा. या वेळेत कडधान्य, भाजी व दुधविक्री केंद्रे खुली राहणार आहेत. दवाखाने, औषधालये, पेट्रोलपंप या आवश्यक सेवा पुर्णवेळ उपलब्ध असतील. घरी कंटाळा येतो किंवा खरोखरोच बाजारपेठ बंद आहे का याची पाहणी करावी यासाठी दुचाकी घेऊन फिरणाऱया युवकांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे व संपुर्ण दिवस पोलीस स्थानकात बसवून रात्री त्यांची सुटका करावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.